बाला उपक्रमांतर्गत- तांबाळा जि.प.शाळेचा नाविण्यपूर्ण उपक्रम माझा वाढदिवस – माझे झाड
निलंगा (भगवान जाधव) : तालुक्यातील तांबाळ्याची जिल्हा परिषद शाळा सातत्याने ‘नाविण्यपूर्ण उपक्रम’ राबवत असते.शाळा उपक्रमात जास्तीत जास्त लोकसहभाग असावा याचा सदैव विचार शाळा करत असते.लोकसहभागाच्या दृष्टीने असाच एक आगळा-वेगळा उपक्रम मुख्याध्यापक दयानंद मठपती यांच्या संकल्पनेतून आज तांबाळा शाळेत सुरु करण्यात आला. ‘माझा वाढदिवस-माझे झाड’ अशा या समाजोपयोगी उपक्रमाचे नाव आहे.हा उपक्रम शाळेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांसाठी व पर्यावरण संवर्धनासाठी सुरु करण्यात आला आहे.प्रत्येक गावात तसेच तांबाळ्यात सुध्दा दररोज एखाद्या मुलाचा,एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस हा असतोच.आणि जवळपास प्रत्येकजन आपला वाढदिवस केक कापून करतच असतो.तांबाळा जिल्हा परिषद शाळेला पाच एकरची जागा उपलब्ध आहे.या पाच पैकी तीन एकर जागेत वृक्षारोपन करण्यासाठी गावातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या वाढदिवसानिमीत्त ‘एक झाड” शाळेत येऊन लावावे.शाळा परिसरात वृक्षारोपन करुन आपला वाढदिवस साजरा करावा असा हा ‘माझा वाढदिवस-माझे झाड’ असा हा उपक्रम आहे.वृक्षारोपनासाठी शाळेच्यावतीने खड्डा तयार करुन व रोपटे उपलब्ध करुन दिले जाणार आहे.वाढदिवस असणा-या व्यक्तीने फक्त शाळेत यायचे व सर्व विद्यार्थ्यांसमोर वृक्षारोपन करावे असे आवाहन शाळेच्यावतीने करण्यात आले आहे.या उपक्रमानिमीत्ताने तांबाळा शाळा परिसरात दररोज किमान एकतरी झाड लावण्यात येणार आहे.मी लावलेले झाड म्हणून तो आजी-माजी विद्यार्थी याची काळजी घेणार आहे,संगोपन करणार आहे.याच उद्देशाने हा उपक्रम आज सुरु करण्यात आला.तांबाळा ग्राम पंचायत सदस्य तथा शाळा व्यस्थापन समिती सदस्य नागेश बोकछडे यांचा वाढदिवस शाळेत वृक्षारोपन करुन साजरा करण्यात आला.आजपासून या नाविण्यपूर्ण उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.शाळा व्यवस्थापन समिती,जि.प.प्रा.शा.तांबाळा व शाळेतील शिक्षक संतोष वाघमारे,श्रीमंत संगनाळे,लक्ष्मण चापाले,दामोधर मोहारे,रोहीदास देवर्षे व नामदेव चोले हे परिश्रम घेत आहेत.