ना.संजय बनसोडे यांना ऑफलाईन क्लासेसला परवानगी साठी क्लासेस संचालकांचे निवेदन
यावेळी क्लासेस संचालकांचे अश्रू झाले अनावर
उदगीर (एल. पी.उगिले) : मागील जवळपास 15महिन्यापासून सर्व कोचिंग क्लासेस बंद आहेत, त्यामुळे अनेक कोचिंग क्लासेस संचलकावर उपासमारीची व नको ती कामे करण्याची वेळ आलेली आहे, म्हणून क्लासेस सुरुवात करण्याची परवानगी द्या. अशी मागणी आज महाराष्ट्राचे मंत्री ना.संजयजी बनसोडे यांच्या उपस्थितीत आयोजित पीटीए च्या बैठकीत एकमताने करण्यात आली, यावेळी अनेक क्लासेस संचालकांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या व्यथा मांडल्या, अनेक क्लासेस संचालकांना अश्रू अनावर झाले, तर कांही क्लासेस संचालक ढसा ढसा रडले व पुणे येथे कोरोनाची आपल्या पेक्षा वाईट अवस्था असताना तिथे क्लासेस चालू करण्यास परवानगी देण्यात आली आहे, मग आम्ही काय पाप केलोत? असे सांगितल्यावर व क्लासेस संचालकांची अंत्यत वाईट अवस्था पाहून ना. संजय बनसोडे यांनी इतर जिल्ह्यात क्लासेसला परवानगी देण्यात आली असेल तर मी लातूर जिल्ह्यात शंभर टक्के क्लासेस सुरुवात करण्यासाठी परवानगी मिळवून देईन असा शब्द दिला.
यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा. शिवाजीराव मुळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष समीरभाई शेख,पीटीए चे राज्य उपाध्यक्ष प्रा. गोपाळकृष्ण घोडके, तालुका अध्यक्ष प्रा. सिद्धेश्वर पटणे, तालुका सचिव प्रा. प्रदीप वीरकपाळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीस शेकडो क्लासेस संचालक महिला व पुरुष उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा.गोपाळकृष्ण घोडके म्हणाले की, गेले चौदा महिने क्लासेस जवळ जवळ बंदच आहेत. क्लास चालक व क्लास वर अवलंबून असणारा इतर कर्मचारी वर्ग या सर्वांची परिस्थिती खूपच हलाखीची झाली असून क्लासेस सुरू करण्याशिवाय अन्य कुठलाही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. याशिवाय पालक मुलांना क्लासला पाठवायला तयार आहेत, विद्यार्थी क्लासला स्वच्छेने यायला तयार आहेत, आई-वडील जेवढी मुलांची काळजी घेतात तेवढीच काळजी शिक्षक ही विद्यार्थ्यांची घेतात. त्यामुळे सर्व नियम पाळण्यास क्लास चालक तयार आहेत, तरी शासनाने २१ तारखेपासून क्लासेस सुरू करण्यास सहकार्य करावे अशी विनंती केली, व असे विनंती करणारे निवेदन प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन, उदगीरच्या वतीने ना.संजयजी बनसोडे व उपविभागीय कार्यालय उदगीर येथे देण्यात आले.
यावेळी बोलताना संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रा. सिद्धेश्वर पटणे म्हणाले की, प्रदीर्घ लॉकडाऊनमुळे क्लास संचालक क्लासेसचे भाडे, नोकर वर्गाचा पगार, दैनंदिन खर्च, लाईट बिल, पाणी बिल यांचे प्रचंड आर्थिक ओझे यामुळे पुरता खचला आहे. तसेच कांही क्लास संचालक आपले निवासी भाडे तसेच कर्जाचे हप्ते देता येऊ न शकल्याने प्रचंड मानसिक तणावाखाली जगत आहेत. बऱ्याच क्लास चालकांना भाड्याची जागा सोडावी लागली आहे .काहींनी बेंचेस व इतर फर्निचर विकून उदरनिर्वाह केला आहे. विद्यार्थ्यांना ताठ मानेने जगायला शिकवनाऱ्या क्लासचालकाला आपले दुख: व्यक्तही करता येत नाही अशी दयनीय अवस्था झाली आहे . त्यामुळे आम्हाला परवानगी देऊन आमची दयनीय अवस्था दूर करावी अशी भावनिक विनंती केली.
यानंतर संघटनेचे सचिव प्रा. प्रदीप वीरकपाळे बोलताना म्हणाले की, शासन जरी ऑनलाइन शिक्षण पद्धतीला प्रोत्साहन देत असले तरी गरीब तसेच ग्रामीण भागातील विदयार्थी ज्यांना स्मार्ट फोन घेणे परवडत नाही असे बरेच विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून आजही वंचित राहिलेले आहेत. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे
मोबाईलच्या छोट्या स्क्रीनवर तासान तास पाहून डोकं, मान व पाठ दुखायला लागणे, डोळ्यातून पाणी येणे तसेच आरोग्य विषयक इतर समस्या सुरु झाल्या आहेत, म्हणून विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने मार्गदर्शक नियमांसह (जसे मास्क , दोन विद्यार्थ्यांमध्ये अंतर व स्वच्छता, पालकांचे संमती पत्र वगैरेचे) पालन करून क्लासेस सुरू करण्याची क्लास संचालकांनी तयारी सुरु केली आहे. कृपया शासनाने याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा असे विचार मांडले.
या कार्यक्रमास पीटीए चे सदस्य, महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्यक्रमाचे संचलन प्रा.सचिन शिंदे, प्रास्ताविक प्रा.सिद्धेश्वर पटणे तर आभार प्रा. नवाज मुंजेवार यांनी मानले.