कोयत्याचा धाक दाखवत आठ लाख 74 हजार रुपये लुटले
पुणे (केशव नवले) : शहरात पेट्रोल पंपावरील मॅनेजर शनिवार, रविवारी जमा झालेली रक्कम बँकेत भरण्यासाठी जात असताना अज्ञात चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवत रस्त्यावर अडवून आठ लाख 74 हजार रुपये लुठले आहेत. भर दिवसा झालेल्या लुटमारी मुळे पुण्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यासंदर्भात वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे.
यासंदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, बाळासाहेब पंढरी अंभोरे (वय 36 वर्ष) हे सय्यदनगर येथील एचपी पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून काम करतात. दरम्यान शनिवारी आणि रविवारी पेट्रोल पंपावर जमा झालेली रक्कम आठ लाख 74 हजार रुपये दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास बँकेत भरण्यासाठी जात असताना काळेपडळ येथील रेल्वे अंडरग्राउंड रस्त्याने पुढे जात असताना समोरून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी दुचाकी आडवी लावून थांबवले व कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याजवळील रक्कम पळवली आहे. यासंदर्भात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात बाळासाहेब पंढरी अंभोरे यांच्या फिर्यादीवरून वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदिवसा पुणे शहरात घडलेल्या या प्रकाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वानवडी पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.