शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी पालकांची गर्दी

शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी पालकांची गर्दी

पुणे (रफिक शेख) : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने पुणे येथील आप्पा बळवंत चौकातील पुस्तके, वह्या आणि शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. अनेक दुकानांमध्ये पुस्तके खरेदीसाठी रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे या रस्त्यावरील रहदारी पूर्णपणे थांबली होती. सद्यस्थितीत ऑनलाइन शिक्षण पद्धती सुरू करण्याचा निर्णय असला तरीही, साहित्य खरेदीसाठी पालकांची एकच गर्दी सुरू झाली आहे. गेल्यावर्षी लॉकडाऊन मुळे शाळा बंद होत्या. पुस्तक खरेदीलाही वेळ मिळाला नव्हता. मात्र यावर्षी शाळा सुरू झाल्याने शैक्षणिक साहित्याच्या खरेदीसाठी एकच गर्दी सुरु झाली आहे. आप्पा बळवंत चौकात पार्किंगची सुविधा कमी असल्याने रस्त्यावरच वाहने उभी केली जातात, तर रस्त्याच्या कडेलाच असणारे पुस्तकांचे स्टॉल आणि पादचाऱ्यांची गर्दी यामुळे आप्पा बळवंत चौक येथुन कोणत्याही रस्त्याला निघायचे म्हटले तर रस्ते ब्लॉक झालेली दिसून येतात. या भागात वाहतूक विभाग असूनही वाहतूक नियमनासाठी पोलिसांचे संख्याबळ कमी असल्याच्या सबबीवर चालढकल केली जाते. परिणामतः या परिसरातील वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा होत आहे.

About The Author