राष्ट्रीय एकात्मतेसाठी रक्तदान काळाची गरज – चंदन पाटील नागराळकर 

राष्ट्रीय एकात्मतेसाठी रक्तदान काळाची गरज - चंदन पाटील नागराळकर 

उदगीर (एल.पी. उगिले) : रक्तदानाच्या भावनेतून मी चे रूपांतर आम्ही मध्ये व्हायला लागते, आणि यातूनच खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता निर्माण होते. सद्यस्थितीत रक्ताची प्रचंड गरज असून रक्तदान शिबिर हे यावर एकमेव पर्याय आहे. असे विचार राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि विविध विभागांच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात आले. यादरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

 या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा उदगीर पंचायत समितीचे सभापती प्रा. शिवाजीराव मुळे, शहराध्यक्ष समीर शेख, राष्ट्रवादी सेवा दलाचे नेते नवनाथ गायकवाड, अजीम दायमी, प्रा. मदन पाटील, माजी शहराध्यक्ष समद शेख यांच्यासह युवक राष्ट्रवादी  काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पुढे बोलताना चंदन पाटील नागराळकर म्हणाले की, रक्तदान केल्यामुळे सामाजिक जाणिवा निर्माण होतात. आपल्यामुळे अडचणीत सापडलेल्या एखाद्या रुग्णांचे प्राण वाचू शकतात. ही भावना मनाला प्रसन्नता आणि चैतन्य देणारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रीय भावना जपण्याची भूमिका रक्तदान शिबिरातून व्यक्त होते. युवकांनी राष्ट्रीय कार्य समजून रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवावा. मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे.

 सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा संसर्ग च्या पार्श्वभूमीवर रक्तदानाचे अत्यंत महत्त्व आहे. राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. यामुळे रक्तदात्यांनी पुढे येणे गरजेचे आहे. असेही ते म्हणाले. त्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

About The Author