खत आणि बियाणे यांची साठेबाजी करून शेतकऱ्यांची लूट करणाऱ्यांना धडा शिकवा – किसान मोर्चा ची मागणी

खत आणि बियाणे यांची साठेबाजी करून शेतकऱ्यांची लूट करणाऱ्यांना धडा शिकवा - किसान मोर्चा ची मागणी

 उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुका आणि परिसरात बी -बियाणे आणि खते यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून जादा दराने बियाणी आणि खतांची विक्री केली जात असल्याची ओरड शेतकरी वर्गातून होत आहे. हे तात्काळ थांबले पाहिजे. शेतकऱ्यांना योग्य दरात आणि त्यांना हवेत त्या प्रमाणात बियाणे आणि खते उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करणारे निवेदन किसान मोर्चाच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

 सध्या उदगीर तालुका आणि परिसरात मृग नक्षत्राचा पाऊस चांगला झाल्याने शेतकरी पेरणीसाठी धडपडताहेत. मात्र अनेक कृषी सेवा केंद्रातून शेतकऱ्यांची लुबाडणूक होत असून जुन्या खताचा साठा असतानाही तो साठा न दाखवता वाढीव दराने सर्रास खत विक्री केली जात आहे. अशी तक्रार शेतकरी करत आहेत. खरिपाच्या पेरणीसाठी आवश्यक असलेल्या बियाणांसाठी ही शेतकऱ्यांना ताटकळत राहावे लागत आहे. बाजारात खतांची आणि बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते आहे. या बाबीकडे महसूल प्रशासन आणि कृषी खात्याने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. अनेक कृषी सेवा केंद्रामध्ये शेतकरी आणि विक्रेते यांच्यामध्ये वाद होऊ लागले आहेत. हे थांबले पाहिजेत. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. अशीही मागणी सदरील निवेदनात केली आहे. त्या निवेदनावर किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण फुलारी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. पंडितराव सुकणीकर यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

 एकीकडे कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी अगोदरच अडचणीत सापडला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. असे असताना या जगाचा पोशिंद्यालाच लुबाडण्याचे पाप व्यापारी करताहेत. शेतकऱ्यांना हव्या असलेल्या खतांच्या ऐवजी इतर खतांची विक्री करण्यासाठी व्यापारी आग्रही आहेत. तसेच शेतकऱ्यांना हव्या असलेल्या कंपनीच्या सोयाबीन बियाणे ऐवजी इतर कंपन्यांची बियाणे विकण्यासाठी कृषी सेवा केंद्र प्रयत्न करत असल्याची ओरड शेतकऱ्यांमधून होते आहे.

 गेल्या दोन वर्षी बोगस बियाणांमुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे आर्थिक बोजा सहन करावा लागला. तसेच उत्पादनातही घट झाल्याने तेथे ही तोटा सहन करावा लागला. अशा दुहेरी संकटात शेतकरी भरडला गेला होता. त्यामुळे आता शेतकऱ्यांना विश्वासाहर्ता असलेल्या कंपन्यांचीच बियाणे हवी आहेत. मात्र व्यापाऱ्याकडून इतर बियाण्यांसाठी आग्रह केला जात असल्याचेही शेतकरी बोलत आहेत. अडला हरी….. म्हणतात त्याप्रमाणे पेरणीच्या लगबगीत मिळेल ते बियाणे घेण्याकडे काही शेतकऱ्यांचा ओढा आहे. मात्र अशा बियाणांमुळे जर नुकसान झाले तर त्याला जबाबदार कोण? असाही प्रश्न निर्माण होतो आहे. या सर्व शेतकऱ्यांच्या अडचणीचा विचार करून शासन आणि प्रशासनाने तातडीने शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून कार्य करावे. अशी आग्रही मागणी किसान मोर्चाच्या वतीने करण्यात येत आहे.

About The Author