देवणी पंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन कंत्राटी मजुरांचा पी.एफ गायब!
देवणी (प्रतिनिधी) : नगर पंचायत घनकचरा व्यवस्थापन विभागात काम करणाऱ्या कंत्राटी मजुरांना किमान वेतन कायदा प्रमाणे मजुरी देणे बंधनकारक असताना मजुरी तर दिलीच नाही, या उलट गेली सात वर्षापासून काम करणाऱ्या एकाही मजुरांचे पीएफ बँकेत जमा केले नाही.जवळपास पन्नास लोकांचे पीएफ हडप केल्याचा प्रकार देवणी नगर पंचायतीत घडला असून सदर ठेकेदारावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मजुरांतून होत आहे.
सविस्तर माहिती अशी की देवणी नगर पंचायत मध्ये गेली सात वर्षापासून स्वामी एजन्सीला घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राट मिळाले असून यात 50 ते 53 कंत्राटी मजूर काम करत आहेत यांना किमान वेतन कायदा लागू असताना त्यांना मासिक 6000 रुपये देऊन, गेली सात वर्षे त्यांची आर्थिक लूट केली आहे व त्यांच्या पगारातून कपात करून घेण्यात आलेली पीएफ ची रक्कम बँकेत जमा न करता हडप केली आहे.मागील काळात आम्हाला शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार मजुरी देण्यात यावी,आमचे कपात केलेली पीएफ तात्काळ बँकेत जमा करण्यात यावे यासाठी मजुरांनी देवणी नगर पंचायतीसमोर आंदोलन केले होते.सदर मजूर व स्वामी एजन्सी यांच्या हस्तक्षेप करून देवणी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांनी किमान वेतन नियमाप्रमाणे मजुरी देण्यात येईल व एक महिन्याच्या आत सर्व मजुरांचे पीएफ बँकेत जमा करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यामुळे मजुरांनी आंदोलन मागे घेतले होते.या गोष्टीला एक दीड महिना उलटून गेला आहे तरी आता सदर स्वामी एजन्सीचे कंत्राट संपले आहे.तरी एजन्सीने पीएफ बँकेत जमा केले नाही व आमचे कंत्राट संपले आहे तुम्ही कामावर येऊ नका असा आलिखित तोंडी आदेश घनकचरा व्यवस्थापनात काम करणाऱ्या मजुरांना देण्यात आला आहे सात वर्षे काम करणाऱ्या या मजुरांना एकदम तुम्ही कामावर येऊ नका असे सांगितले असल्याचे पन्नास पंचावन्न लोकांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. घनकचरा व्यवस्थापन करणारी एजन्सी कोणतीही असो आम्ही नगर पंचायतीचे काम केले आहे आमचे पीएफ तात्काळ बँकेत जमा करण्यात यावे व मजुरांना कामावर पूर्ववत करण्यात यावे अन्यथा देवणी नगर पंचायत कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पुंगी वाजवा आंदोलन करण्यात येईल असे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांना देण्यात आले आहे. यावेळी उपजिल्हा प्रमुख विनोद तेलंगे, प्रवक्ते बंडेपा पडसलगे,ता.अध्यक्ष रविकिरण बेळकुंदे,शहर अध्यक्ष महादेव मोतीपवळे,बालाजी श्रीमंगले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.