क्रिकेट स्पर्धेत कै. रसिका महाविद्यालयाचा संघ विजयी
देवणी (प्रतिनिधी) : कै. रसिका शैक्षणिक संकुलांतर्गत संपन्न झालेल्या क्रिकेट स्पर्धेत कै. रसिका महाविद्यालयाचा संघ विजेता ठरला. संस्थेचे सचिव मा. श्री. गजाननजी भोपणीकर साहेब यांच्या संकल्पनेतून आबासाहेब इंग्लिश स्कूल व कै. रसिका महाविद्यालयातील कर्मचारी यांच्यात घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये कै. रसिका महाविद्यालयाचा क्रिकेट संघ विजेता ठरला. अत्यंत उत्साहात रंगलेल्या या अटीतटीच्या सामन्यामध्ये रसिका महाविद्यालयाच्या क्रिकेट संघाने बाजी मारली. या स्पर्धेचे उद्घाटन प्रा.डॉ.सुलोचना डेंगाळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे, उपप्राचार्य डॉ. शिवाजी सोनटक्के, प्रा. डॉ. विजयकुमार मोरे, प्रा. डॉ. पुरुषोत्तम मोरे, प्रा. डॉ. अंकुश भास्कर प्रा. डॉ. रेणुका कुनाळे, प्रा. रोहिदास पावरा यांची उपस्थिती होती. कर्णधार प्रा. डॉ. प्रशांत भंडे यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्यांचा हा निर्णय संघातील खेळाडूंनी सार्थ ठरवला. सलामीचे फलंदाज प्रा. डॉ. महादेव टेंकाळे व सुरज रंडाळे यांनी शानदार फटकेबाजी करीत संघाला नाबाद अर्धशतक मिळवून दिले. त्यांनी केलेल्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर संघाने केवळ 2 गडी बाद 71 धावा काढल्या. महाविद्यालयाच्या संघाने काढलेल्या धावांचा पाठलाग करताना आबासाहेब इंग्लिश स्कूलचा संघ दहा षटकांमध्ये 49 धावा काढून आटोपला. गोलंदाजी, फलंदाजी व क्षेत्ररक्षण या सर्व क्षेत्रांमध्ये महाविद्यालयाच्या संघाने अतिशय दिमाखदार कामगिरी केली. संघाच्या विजयामध्ये प्रा. डॉ. महादेव टेंकाळे, सुरज रंडाळे, विनोद बिरादार, सुमित मोहिते, व्यंकट पांढरे, विजयकुमार भोजने, महेश मोरे, प्रा.स्वप्नील काळे, दीपक पाटील, राजू माने, यांनी मोलाचे योगदान दिले.
आबासाहेब इंग्लिश स्कूलच्या संघात कर्णधार प्राचार्य राहुल बालुरे, स्पर्धा आयोजक व खेळाडू मा. गजाननजी भोपणीकर, क्षेमानंद कन्नाडे, रणजीत गायकवाड, विक्रम गायकवाड, मंजुनाथ कन्नाडे, अनंत बिरादार, उमेश अंबेनगरे, अभिषेक खुळे, करण दूधभाते, सत्यनारायण गडदे यांचा समावेश होता. रसिका शैक्षणिक संकुलाअंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांच्या विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन या पुढे नेहमी करण्यात येणार आहे, त्या माध्यमातून आनंदी, आरोग्यदायी व तणामुक्त शैक्षणिक वातावरण निर्मिती होईल. असा मनोदय या स्पर्धेचे संयोजक मा. श्री. गजाननजी भोपणीकर साहेब यांनी यावेळी व्यक्त केला. या क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. संघाचे कर्णधार प्रा. डॉ. प्रशांत भंडे यांना विजेतेपदाची ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. महादेव टेंकाळे यांना 36 धावा काढून उपयुक्त कामगिरी केल्याबद्दल सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. या सामन्याचे पंच म्हणून नरसिंग दापके व प्रा. डॉ. गोपाल सोमाणी यांनी मोलाची भूमिका पार पाडली. अतिशय आनंदाच्या व खेळीमेळीच्या वातावरणात या स्पर्धा संपन्न झाल्या. महाविद्यालयातील व इंग्लिश स्कूलच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी या खेळाचा आनंद घेतला.