दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर!:SSCमध्ये लातूर विभाग टॉप
लातूर (प्रतिनिधी) : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 29.86 टक्के लागला आहे. निकालात 51.47 टक्क्यांसह लातूर विभाग पहिल्या स्थानावर आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाने परिपत्रकाद्वारे दहावीचा निकाल आणि विभागवार टक्केवारी जाहीर केली.
त्याचबरोबर बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेचा निकाल देखील जाहीर झाला आहे. बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल आज, 28 ऑगस्टला ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर त्यांचा निकाल पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे. निकालात विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध करुन देण्याच आले आहेत.
दहावीत लातूरअव्वल तर मुंबई विभाग सर्वात कमी
दहावीच्या निकालात लातूर विभागाने बाजी मारली आहे. तर त्याखालोखाल अमरावती, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे आणि मुंबई विभागाने कामगिरी केली आहे. लातूर विभागाचा सर्वाधिक 51.47 टक्के निकाल लागला आहे. तर सर्वात कमी 15.75 टक्के निकाल मुंबई विभागाचा लागला आहे.
विभागवार निकाल
लातूर : 51.47 टक्के
अमरावती- 43.37टक्के
नागपूर -41.90टक्के
नाशिक – 41.90 टक्के
औरंगाबाद -37.25 टक्के
कोल्हापूर – 29.18 टक्के
पुणे -22.22टक्के
मुंबई – 15.75 2टक्के
मार्च 2023 मध्ये झाल्या होत्या परीक्षा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा 18 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत पार पडली. यंदा दहावीच्या परीक्षेला 49 हजार 377 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परंतु मागील तीन वर्षाच्या तुलनेत यंदाची निकालाची आकडेवारी घसरली आहे. निकालासंदर्भात काही आक्षेप असेल किंवा गुणपडताळणीसाठी अर्ज करायचे असेल तर अर्ज करण्याची मुदत 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरपर्यंत करता येणार आहे.
अर्ज कुठे आणि कसा कराल?
दहावीच्या निकाल जाहीर झाला आहे. त्यात अनेक विद्यार्थ्यांना निकालाबाबत अनेक अडचणी किंवा आक्षेप असल्यास तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणीसाठी, उत्तरपत्रिका प्रत मिळवण्यासाठी, पुनर्मूल्यांकन यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर verification.mh-ssc.ac.in अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज करताना सगळी माहिती, अटी शर्ती आणि सुचना वेबसाईटवर देण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेसाठी ऑनलाईनच पैसे भरावे लागणार आहेत. यासाठी आवश्यक शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरता येईल.
गुणपडताळणीसाठी अर्ज क 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरपर्यंत करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. गुणपडताळणीसाठी प्रति विषय रु.50/- शुल्क ऑनलाईन पद्धतीने मंडळाकडे जमा करावे लागेल. जुलै- ऑगस्ट- 2023 च्या परीक्षेतील
विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स कॉपी मागणीसाठी ई-मेलद्वारे/संकेतस्थळावरुन स्वत: जाऊन घेणे पोस्टाने यापैकी एका पर्यायाची निवड करता येईल आणि त्यांनी मागणी केलेल्या पद्धतीने झेरॉक्स कॉपी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. झेरॉक्स कॉपीसाठी प्रति विषय 400 रुपये शुल्क भरावं लागणार आहे.
बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल 32.13 टक्के
बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेच्या निकालाची टक्केवारी 32.13 टक्के आहे. बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेला 68 हजार 909 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी 22 हजार 144 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीची पुरवणी परीक्षा 18 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान घेण्यात आली होती. बारावी बोर्डाची पुरवणी प्रात्यक्षिक परीक्षा 18 जुलै ते 5 ऑगस्ट आणि लेखी परीक्षा 18 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधी दरम्यान पार पडली.
विभाग निहाय आकडेवारी
मुंबई – 24.82
पुणे – 29.36
नागपूर – 37.63
औरंगाबाद – 49.64
लातूर – 58.55
कोल्हापूर – 30.15
अमरावती – 32.02
नाशिक – 36.81
कोकण – 27.74
गुणपडताळणी, झेरॉक्स कॉपी आणि पुनर्मूल्यांकन
निकाल झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच 29 ऑगस्टपासून गुणपडताळणीसाठी तसेच उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती आणि पुनर्मूल्यांकन यासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. यासाठी विद्यार्थ्यांना http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर सर्व माहिती अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत. गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती आणि पुनर्मूल्यांकन यासाठीचे शुल्क ऑनलाईन पध्दतीनेच भरावं लागणार आहे.
गुणपडताळणीसाठी काय करावं लागेल?
गुण पडताळणीसाठी अर्ज करावयाची मुदत 29 ऑगस्ट 2023 पासून 07 सप्टेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे गुणपडताळणीसाठी प्रति विषय 50 रुपये शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरावे लागेल.
उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स कॉपीच्या मागणीसाठी
उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मागणीसाठी म्हणजे झेरॉक्स कॉपीच्या मागणीसाठी ई-मेल, वेबसाईट, घरपोच किंवा रजिस्टर पोस्टाने यापैकी एका पर्यायाची निवड करता येईल. विद्यार्थ्यांनी संबंधित विभागीय मंडळाकडे 29 ऑगस्ट 2023 पासून 07 सप्टेंबर 2023 पर्यंत या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स कॉपीसाठी प्रति विषय 400 रुपये शुल्क भरावे लागेल, हे शुल्क ऑनलाईन पध्दतीने जमा करावे लागेल.
उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी
परीक्षार्थींना उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावा लागणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी आधी उत्तरपत्रिकेची झेरॉक्स कॉपी घेणे अनिवार्य असेल, त्यानंतर झेरॉक्स कॉपी मिळाल्याच्या पुढील पाच दिवसांत विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करावा लागेल. उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी प्रत्येक विषय 300 रुपये शुल्क ऑनलाईन भरावे लागेल.