मेजर ध्यानचंद हे उत्कृष्ट हाॅकिपटू आणि महान देशभक्त होते – प्रो. डॉ. अभिजीत मोरे
अहमदपूर (गोविंद काळे) : भारताला हाॅकी या खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवणारे आणि ऑलिंपिक स्पर्धेतील सुवर्णपदक मिळवून देणारे मेजर ध्यानचंद हे उत्कृष्ट हाॅकिपटू तर होतेच, त्याच बरोबर ते एक महान देशभक्त होते असे प्रतिपादन महात्मा फुले महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रोफेसर डॉ. अभिजीत मोरे यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, येथील महात्मा फुले महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रीडा दिन व मेजर ध्यानचंद यांच्या जयंती कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते.यावेळी उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी यांची विशेष उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना प्रो.डॉ. मोरे म्हणाले की, मेजर ध्यानचंद यांचा हाॅकीचा खेळ पाहून जर्मनीचा सर्वेसर्वा हिटलरने अचंबित होऊन मेजर ध्यानचंद यांना जर्मनीच्या सैन्यात सर्वोच्चपद देण्याबरोबरच जर्मनीचे नागरिकत्व देण्याचेही कबूल केले होते. मात्र आपल्या देशावर माझे प्रचंड प्रेम असून, मी माझी जन्मभूमी कदापिही सोडणार नाही, असे बाणेदार उत्तर मेजर ध्यानचंद यांनी दिले होते, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, मेजर ध्यानचंद यांनी आपले संपूर्ण आयुष्य खेळासाठी वाहिले होते. अशी माणसं ही देशाची शान असतात. मेजर ध्यानचंद यांच्या जीवन कार्यातून तरुणांनी प्रेरणा घेऊन देशसेवा करावी, असे ही ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले. डॉ. मारोती कसाब यांनी सूत्रसंचालन केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. सतीश ससाणे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.