शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी बहुजन विकास अभियानचे मुंगसे आंदोलन
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर पंचक्रोशीतील शेतकरी सध्या अडचणीत आला आहे. खरीप हंगामात पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शासन आणि प्रशासन या बाबीकडे फारसे गांभीर्याने घेत नाही. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच लातूर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, या मागणी सोबतच शेतकऱ्यांसाठी इतरही अनेक मागण्या करण्यासाठी बहुजन विकास अभियान या संघटनेच्या वतीने मुंगसे आंदोलन करण्यात आले. रोजगार हमीची कामे चालू करा. शेतकऱ्यांना जनावराच्या चाऱ्यासाठी अनुदान द्या. यावर्षीचा आणि गेल्या वर्षीचा विमा सरसकट तात्काळ लागू करा. शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, सालगडी, अपंग, निराधार, बेरोजगार, विधवांना दरमहा अर्थसाह्य करा. अशा विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाला देण्यात आले. सदरील निवेदनावर अभियान प्रमुख संजय कुमार, मानसिंग पवार, संजय राठोड, नरसिंग गुरमे, राजकुमार गाथाडे, आकाश कस्तुरे, अमोल सूर्यवंशी, अंबादास पाटील, रवी डोंगरे, राजकुमार कारभारी, बसवराज महाराज, सुनील पाटील, युवा आघाडीचे फिरोज पठाण, सुलेमान पटेल, अनिल भोसले महिला आघाडीच्या सरूबाई सूर्यवंशी, तेजाबाई कांबळे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शासनाने शेतकऱ्याला गृहीत धरले आहे. शेतकऱ्या बद्दल सरकार काहीच बोलत नाही. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी बहुजन विकास अभियान च्या वतीने मुंगसे आंदोलन करण्यात आले, या नावीन्यपूर्ण आंदोलनासाठी सीमावर्ती भाग आणि उदगीर तालुक्यातील अनेक नागरिक उपस्थित होते.