मराठवाडा मुक्तिसंग्राम लढा हा सामुहिक लढा होता – बालाजी मुस्कावाड
उदगीर (प्रतिनिधी) : मराठवाडा जनता विकास परिषद, उदगीर यांच्या मार्फत संत ज्ञानेश्वर विद्यालय उदगीर येथे आयोजित मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते बालाजी मुस्कावाड म्हणाले, मराठवाडा मुक्तिसंग्राम लढा हा सामुहिक लढा होता.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक कपिल वट्टमवार तर प्रमुख वक्ते म्हणून श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयाचे एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड, प्रमुख पाहुणे राम मोतीपवळे, रिझर्व्ह बँकेचे सेवानिवृत्त मॅनेजर मुरलीधर जाधव , श्याम कुलकर्णी हे उपस्थित होते.
मराठवाडा जनता विकास परिषद उदगीर यांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संत ज्ञानेश्वर विद्यालय उदगीर येथे व्याख्यानाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते बालाजी मुस्कावाड आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, मराठवाडा मुक्तिसंग्राम लढा हा सामुहिक लढा होता. मराठवाडा, कर्नाटकचा काही भाग व तेलंगणा हा प्रदेश हैद्राबाद संस्थानात येत होता. या भागातील जनता एकत्रित येऊन हा लढा लढला गेला. १७ सप्टेंबर १९४८ रोजी आपला मराठवाडा निजामाच्या ताब्यातून स्वतंत्र झाला. आणि आपण स्वातंत्र्यात जीवन जगू लागलो . या लढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले. त्यांच्यासोबत अनंत भालेराव, गोविंदराव नानल, दिगंबरराव बिंदू, उदगीरचे भाई श्यामलाल, बन्सीलाल, अप्पाराव पाटील कौळखेडकर, मलशेट्टीअप्पा पाटील नागराळकर या इतर स्वातंत्र्य सैनिकांनी सहकार्य केले. गावोगावी जाऊन जनतेत जागृती निर्माण करण्याचे महान कार्य या स्वातंत्र्य सैनिकांनी केले. रामटेक, घोणसी, तिरुका, देवणी, तोंडचिर अरसनाळ या भागात झालेल्या लढाईत आपल्या परिसरातील स्वातंत्र्य सैनिकांनी आपले योगदान दिले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुरलीधर जाधव यांनी केले. ते म्हणाले, सर्वप्रथम मी मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या लढ्यात ज्या ज्या स्वातंत्र्यसेनानींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्यांना मी अभिवादन करतो. हा इतिहास आजच्या विद्यार्थ्यांना माहित असणे खूप आवश्यक आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राम मोतीपवळे यांनी संत ज्ञानेश्वर विद्यालय यांनी व्याख्यानासाठी परवानगी दिली त्याबद्दल आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. एस. बिरादार यांनी केले .