महात्मा बसवण्णा यांनी स्त्रियांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य देवून लोकशाही निर्माण केली – अँड. गिरवलकर

महात्मा बसवण्णा यांनी स्त्रियांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य देवून लोकशाही निर्माण केली - अँड. गिरवलकर

उदगीर (प्रतिनिधी) : बाराव्या शतकात महात्मा बसवण्णा यांनी स्त्रियांना विचारांचे, मत मांडण्याचे, सभेत सहभागी होण्याचे, संसदेत आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य देवून अनुभव मंडपाच्या माध्यमातून लोकशाही निर्माण केली. स्री स्वातंत्र्याचा इतिहास जगामध्ये अठराव्या शतका नंतर पासुनचा सांगितला जातो. परंतु महात्मा बसवण्णा यांनी बाराव्या शतकामध्ये स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने वागणूक देवून समतेचे तत्व निर्माण केले, असे प्रतिपादन लातूर येथील साहित्यिका अँड. रजनी गिरवलकर यांनी केले.

धर्मवीर संग्रामप्पा शेटकार यांच्या ८४ व्या स्मृतिप्रीत्यर्थ वीरशैव समाज उदगीरच्या वतीने आयोजित ८९ व्या वचन सप्ताहाच्या कार्यक्रमात पहिले पुष्प त्यांनी गुंफले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्त्री रोग तज्ञ डॉ. सुलोचना येरोळकर होत्या. विचारमंचावर समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापूरे, माजी कोषाध्यक्ष चनबसप्पा वगदाळे होते. महात्मा बसवेश्वर व धर्मवीर संग्रामप्पा शेटकार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आले.
याप्रसंगी पुढे बोलताना अँड. गिरवलकर यांनी, महात्मा बसवण्णा यांनी केलेली विचारांची क्रांती, व्यवस्थेवर घातलेला घाव, समाजात निर्माण केलेले परिवर्तन, स्त्रियांना दिलेली समता, बंधुता आणि समानता जगातील कोणत्याही देशाने एवढी उच्चता स्त्रीला दिलेली नव्हती. स्त्री स्वातंत्र्य आणि महात्मा बसवण्णा यांचा फार जवळचा संबंध आहे. २६ नोव्हेंबर १९५० रोजी अस्तित्वात आलेली भारताची राज्यघटना, यात दिलेले मूलभूत हक्क, हे महात्मा बसवण्णांच्या विचाराशी नाते सांगणारे आहे. आज स्त्री स्वातंत्र्य हे स्वैराचाराकडे झुकते आहे असे काहीसे चित्र दिसत असल्याची खंत व्यक्त करून त्यावर वेळोवेळी वैचारिक मंथन होऊन स्त्री स्वातंत्र्याची खरी परिभाषा कळणे गरजेचे आहे. अन्यथा पुन्हा वेगळ्या कायद्याच्या निर्मितीची गरज समाजाला भासणार आहे असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. सुलोचना येरोळकर यांनी, महात्मा बसवेश्वरांची वचने समाजाला मार्गदर्शक असून समाजसुधारकांनी केलेले कार्य हे समाजाला दिशादर्शक असतात असे सांगितले. वचन सप्ताहाच्या माध्यमातून वीरशैव समाज सामाजिक जनजागृतीचे कार्य करीत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. प्रास्ताविक गुरुप्रसाद पांढरे यांनी केले. सुत्रसंचालन अँड. महेश मळगे यांनी केले. आभार उत्तरा कुलबुर्गे यांनी मानले. यावेळी समाजबांधव उपस्थित होते.

About The Author