लातुर जिल्हा म.स. बँकेचे कामकाज तळ मजल्यावर सुरू करा

लातुर जिल्हा म.स. बँकेचे कामकाज तळ मजल्यावर सुरू करा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलनाचा इशारा

अहमदपुर ( गोविंद काळे ) येथील लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दुसऱ्या मजल्यावर सुरू करण्यात आली आहे. वयोवृद्ध शेतकऱ्यांना पायऱ्या चढून जाण्यास त्रास सहन करावा लागत आहे. तात्काळ बॅंकेचे कामकाज तळमजल्यावर सुरू करा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपतालुका प्रमुख अनिकेत फुलारी यांनी उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
येथील लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची तीन मजली इमारत असून सदरील बॅंकेचा संपूर्ण व्यवहार हा दुसऱ्या मजल्यावर केला जातो तर तिसरा मजला हा सोसायटीच्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांची बॅंक म्हणून ओळखली जाते, या बॅंकेचे ज्यास्तीत ज्यास्त ग्राहक हे वयोवृद्ध शेतकरी असतात हे प्रामुख्याने निदर्शनास येते. सदरील बॅंकेचा व्यवहार हा दुसऱ्या मजल्यावर होत असल्यामुळे वयोवृद्ध ग्राहकांना नाहक ९० ते १०० पायऱ्या चढून बॅंकेत प्रवेश करावा लागत आहे. काही वयोवृद्ध शेतकरी पायऱ्या चढताना तोल जाऊन कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यांना गंभीर स्वरुपाच्या दुखापती होत आहेत. मुख्यत्वे वयोवृद्ध नागरिकांना श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना,विधवा महिला, अपंग व्यक्ती व इत्यादी योजनांचे याच बॅंकेतुन पगार दिले जातात, त्यांच्यासाठी कधीतरी तळमजल्यावर तात्पुरती व्यवस्था करुन पगार वितरीत केला जातो. म्हणून कायमस्वरूपी लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य शाखा अहमदपुर येथील बॅंकेत होणारे सर्व व्यवहार हे तळमजल्यावरच करण्याबाबत आदेशीत करण्यात यावे. अनेक वयोवृद्ध ग्राहक हे पायऱ्या चढण्याच्या त्रासाला कंटाळून या बॅंकेत खाते काढण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. शासनाने बॅंकेची स्थापना ही नागरीकांची सोय होण्यासाठी प्रत्येक गाव स्तरावर करण्यात आली आहे परंतु मुख्य उद्देशाची पूर्तता न होता ला.जि.म.स. बॅंक शाखा अहमदपुर येथील बॅंकेचा सर्व व्यवहार हा दुसऱ्या मजल्यावर होत असल्यामुळे वयोवृद्ध ग्राहकांची सोईस्कर सोय न होता त्यांना अनेक शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेषत: शहरातील सर्व मुख्य बॅंकेचा व्यवहार हा तळमजल्यावरच पाहिला जातो. तरी आपण तात्काळ शेतकऱ्यांच्या हितासाठी तळमजल्यावर ब‌ॅंकेचे सर्व व्यवहार सुरळीत सरळ सेवा देण्यासाठी सहकार्य करावे अन्यथा वयोवृद्ध ग्राहकांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, ला.जि.म.स.बॅंक शाखा अहमदपुर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनावर उपतालुका प्रमुख अनिकेत फुलारी, शहर प्रमुख शिवा कासले, उपशहरप्रमुख शिवकुमार बेद्रे, विभाग प्रमुख गणेश माणे, शिवा भारती, परमेश्वर भदाडे, युवा सेनेचे अजित सुरनर, गणेश चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

About The Author