एल.सी.बी.च्या तपासाची वाढली गती !! गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची चालेना मती !!!
लातूर ( एल. पी. उगीले ) : सध्या लातूर पोलिसांनी तपासाच्या संदर्भात चांगली गती घेतली आहे. विशेषतः स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने उल्लेखनीय कामगिरी केली जाते आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यातील गेला माल शोधण्याच्या कामात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा चांगलीच आग्रेसर आहे. यासोबतच जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांना प्रतिबंध घालण्यासाठी देखील आता एलसीबीने कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. लातूर तालुक्यातील मौजे भिसे वाघोली येथील शेतकऱ्यांनी आपल्या फायद्यासाठी उसाच्या शेतात अवैध स्वरूपाचा व्यवसाय करण्यासाठी गांजाची लागवड करून जोपासना केली होती.
यासंदर्भात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने महसूल अधिकाऱ्यांच्या साक्षीने सदरील उसाच्या फडात धाड टाकून त्या ठिकाणी लागवड आणि जोपासना केलेल्या गांजाची झाडे जप्त केली आहेत. अंदाजे दोन लाख नऊ हजार चारशे रुपयांचा गांजासह पोलिसांनी नामदेव नारायण वायाळ आणि नवनाथ नामदेव वायाळ या पिता-पुत्रांना अटक केली आहे. नामदेव व नवनाथ या पितापुत्रांनी भिसे वाघोली शिवारातील गट नंबर 34 मधील उसाच्या पिकात गांजाचे 13 झाडे लावल्याचे आढळून आले ज्याचे वजन 34 किलो भरले. या गांजाची अंदाजे किंमत दोन लाख नऊ हजार चारशे रुपये इतकी आहे.
लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार राजेश जाधव यांच्या साक्षीने व इतर अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे,अंगद कोतवाड, फड, गवारे, शेख, मुंडे यांच्या पथकाने धाड टाकून ही कारवाई केली आहे. नामदेव नारायण वायाळ आणि नवनाथ नामदेव वायाळ या दोघांनाही अटक करून यांच्याविरोधात गुरनं.149/21 प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे,गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985अन्वये कलम 20(अ), 20(ब) 2(क)अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक सुर्वे हे करत आहेत.