समाज माध्यमांचा गैरवापर करून दीड लाखाला फसवले
उदगीर (अॅड.एल.पी.उगीले) : सध्या समाज माध्यमाच्या गैर वापराचे पेव फुटले आहे. वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून सर्वसामान्यांची लुबाडणूक करणे चालू आहे. फेसबुक, व्हॉट्सॲप यांच्या माध्यमातून एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तींचे अकाउंट हॅक करून त्याच्या नावाने पैसे मागण्याचे प्रकार सर्रास चालू आहेत. असाच काहीसा प्रकार उदगिर शहरात घडला आहे. यासंदर्भात उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, हैद्राबाद येथे राहणारा फिर्यादी मकरंद पद्माकर देशमुख हे उदगीर येथे काही कामानिमित्त आले होते. त्यांच्या एका मित्राच्या व्हाट्सअप क्रमांकावरून दीड लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा संदेश त्यांना मिळाला. फिर्यादी मकरंद देशमुख यांनी आपला मित्र अडचणीत असल्यामुळे पैशाची मागणी करत असेल असे समजून ऑनलाइन पद्धतीने दीड लाख रुपयांची रक्कम संबंधितांच्या खात्यावर पाठवली. त्यानंतर मित्राशी संवाद साधून या संदर्भात माहिती विचारली असता, आपण पैसे मागितले नसल्याचे देशमुख यांना त्यांच्या मित्राने सांगितले.
व्हॉट्सऍप हॅक करून आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात येताच मकरंद देशमुख यांनी उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. ज्या बँकेत खात्यावर पैसे पाठवण्यात आले त्या बँकेचा पत्ता काढल्यानंतर प्रीतमकुमार रेंग रा. डुलुमा (त्रिपुरा राज्य) त्याच्या खात्यावर रक्कम जमा झाल्याची माहिती प्राप्त झाली. प्रीतमकुमार रेंग त्याच्याविरुद्ध उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 168 /21 कलम 66 (सी) (डी) माहिती तंत्रज्ञान अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक गोरख दिवे हे करत आहेत.