किशोरी मुर्के हिला आय.सी.एम.ए. स्कॉलरशिप मिळाल्याबद्दल सत्कार
लातूर (प्रतिनिधी) : कलर्स मराठी या वाहिनी वरील ‘सुर नवा ध्यास नवा’ या लोकप्रिय रियालिटी शो मध्ये कु.किशोरी भुजंग मुर्के हिची निवड झाली होती. तिने आपल्या मधुर आवाजात शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी सादर करून संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करून टाकले होते. शास्त्रीय संगीताचा झेंडा सातासमुद्रापलीकडे घेऊन जाणारे, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायक पं.महेशजी काळे यांनी कु.किशोरी मुर्के हिचे गायन ऐकून तिला इंडियन क्लासीकल म्युझिक अँन्ड आर्टस फाऊंडेशन स्काँलरशिप जाहीर केली आहे. या माध्यमातून तिला प्रति महा 10,000 रुपये व पं. महेश काळे यांच्याकडून मोफत शास्त्रीय संगीताचे धडे मिळणार आहेत. ही शिष्यवृत्ती तिला शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेई पर्यंत मिळणार आहे. आतापर्यंत केवळ दोघांना ही शिष्यवृत्ती मिळाली आहे.
तिच्या या यशाबद्दल दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपप्राचार्य अनिलकुमार माळी, संगीत विभागप्रमुख डॉ. देवेंद्र कुलकर्णी, डॉ. संदीप जगदाळे, भुजंग मुर्के, प्रा शरद पाडे, कार्यालयीन अधीक्षक श्री. नवनाथ भालेराव आदी उपस्थित होते. किशोरी सध्या दयानंद कला महाविद्यालयात बी.ए.प्रथम वर्षात शिकत आहे. तिला तिचे वडील सुरमणी भुजंग मुर्के यांच्याकडून संगीताचे धडे मिळाले आहेत. लातूरच्या सांगीतिक लौकिकात भर पाडणाऱ्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.