कोरोनामुळे निराधार झालेल्या कुटुंबीयांना मिळणार विविध शासकीय योजनांचा लाभ
लातूर ग्रामीण संगांयो समिती, लातूर तहसील कार्यालय व सखी वन स्टॉप सेंटरने घेतला पुढाकार
लातूर (प्रतिनिधी) : लातूरचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमितजी विलासरावजी देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर तालुक्यातील कोरोना संसर्गाने दगावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला शासकीय योजनांचा घरपोच लाभ देण्यासाठी लातूर ग्रामीणची संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती कार्यरत असून विविध योजनांसाठी पात्र कुटुंबांना गावपातळीवर एकाच वेळी लाभ देण्यासंदर्भाने नुकतेच ‘संगांयो’चे अध्यक्ष प्रविण हणमंतराव पाटील यांनी लातूरचे तहसीलदार तथा संगांयो समितीचे सचिव स्वप्नील पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी नायब तहसीलदार राजेश जाधव, बाल संरक्षण अधिकारी सिताराम कांबळे व सखी वन स्टॉप सेंटर लातूर च्या केंद्र समन्वयिका श्रीमती मंगल जाधव मगर यांची उपस्थिती होती.
पहिल्या व दुस-या कोरोनाच्या लाटेत घरातील कमावता सदस्य गमावलेल्या कुटुंबांना मानसिक, आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा कुटुंबांना आधार देण्यासाठी लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या संकल्पनेतील हे अभियान प्रशासनाने हाती घेतले आहे. लातूर ग्रामीणची ‘संगांयो’ समिती सहकारमहर्षी दिलीपरावजी देशमुख व आमदार धिरजजी विलासरावजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर तालुक्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबांचा शोध घेऊन त्यांना घरपोच विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सरसावली आहे. लातूर तालुक्यातील बोरी येथे निराधार कुटुंबांना संगांयोच्या वतीने भेटी देऊन त्यांच्याकडून निराधार महिला, वयोवृद्ध यासह बालसंगोपन योजनांचे अर्ज नुकतेच भरुन घेण्यात आले. यावेळी ‘संगांयो’चे अध्यक्ष प्रविण पाटील, सखी वन स्टॉप सेंटर लातूर च्या केंद्र समन्वयिका श्रीमती मंगल जाधव मगर, बोरी येथील पदाधिकारी शंकरराव पाटील, कमलाकर अनंतवाड, दिलीप पेदाटे, कविता भंडे, तलाठी जंगमे आदी उपस्थित होते.
स्थानिक प्रशासन व गावातील लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने निराधार पात्र कुटुंबांचा शोध घेऊन त्यांचा अर्ज भरुन संबंधित कुटुंबाकडून आवश्यक ती कागदपत्रे जमा केली जात आहेत. यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती वर्षा पवार, ‘संगांयो’ चे सदस्य तथा लातूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्याम गोडभरले, नायब तहसीलदार राजेश जाधव, श्रावण ऊगिले, रत्नाकर महामुनी, ‘संगांयो’ समितीचे सदस्य सर्वश्री अमोल देडे, सौ.शितल राजकुमार सुरवसे, धनंजय वैद्य, हरीश बोळंगे, अमोल भिसे, संजय चव्हाण, परमेश्वर पवार, रमेश पाटील व आकाश कणसे आदींच्या सामुहिक प्रयत्नांतून संबंधित विभागाकडून तातडीने कार्यवाही केली जाणार आहे.
कोरोनामुळे कुटुंबाचे छत्र हरवलेल्या लातूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील कुटुंबांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्यात येणार आहे तेव्हा प्रत्येक गावातील निराधार कुटुंबांनी संगांयो समितीचे सदस्य, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आदी प्रशासकीय अधिकारी तसेच सरपंच, उपसरपंच स्थानिक लोकप्रतिनिधी व संजय गांधी योजना समन्वयक यांच्याकडे संपर्क करावा, असे आवाहन लातूर ग्रामीण ‘संगांयो’ समितीचे अध्यक्ष प्रविण पाटील, लातूर संगांयो समितीचे सचिव तथा तहसीलदार स्वप्नील पवार यांनी केले आहे.