नवयुवक व्यापारी गणेश मंडळाचे सामाजिक कार्य मोलाचे – ना. संजय बनसोडे
उदगीर : शहरातील प्रतिष्ठित असलेल्या श्री नवयुवक व्यापारी गणेश मंडळाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमामुळे सामाजिक हित जोपासले जात आहे. या गणेश मंडळाचे सामाजिक कार्य हे मोलाचे असुन विविध उपक्रमाच्या माध्यामातून समाजहित जोपासण्याचे कार्य या मंडळाच्या वतीने करण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण व बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी केले.
ते उदगीर येथील संघर्ष मित्र मंडळ व श्री नवयुवक व्यापारी गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सव 2023 च्या अनुषंगाने पूर्व तयारीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ना. संजय बनसोडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आ. गोविंद केंद्रे, माजी नगराध्यक्ष तथा सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष राजेश्वर निटूरे, बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, सहयोग अर्बन बँकेचे अध्यक्ष रमेश अंबरखाने, भाजपचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, नारायणा अॅग्रो चे संचालक सागर महाजन, पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, नगर परिषदेचे मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, सतीश पाटील, चंद्रकांत टेंगेटोल, सय्यद जानी, आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना ना. बनसोडे यांनी श्री नवयुवक व्यापारी गणेश मंडळ हे केवळ गणेशोत्सवापुरते मर्यादित काम न करता वर्षभर विविध उपक्रम राबवून सामाजिक हिताला प्राधान्य देत आहे, हे उल्लेखनीय असल्याचे सांगुन, आगामी काळात जी गणेश मंडळे गेल्या अनेक वर्षांपासून स्थापन केली जात आहेत, त्यांना एकदा परवानगी घेतल्यानंतर पाच वर्षे परवानगी काढण्याची गरज राहणार नाही. या बाबत ही माहिती देवुन अनेक गणेश मंडळांकडून उत्कृष्ट देखावे सादर केले जातात, पण रात्री दहा वाजेपर्यंत मार्यदित वेळ असल्याने शेवटच्या दिवसात गणेश मंडळांसमोर गर्दी वाढत आहे. त्यामुळे शेवटचे चार दिवस देखावे दाखविण्यासाठी रात्री बारा वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्याचा निर्णयही राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती यावेळी ना. संजय बनसोडे यांनी दिली.
संघर्ष मित्रमंडळ व श्री नवयुवक व्यापारी गणेश मंडळ गेल्या दोन तीन वर्षांपासून सोमनाथपुर येथील गोरक्षण संस्थेच्या माध्यमातून गोसेवेचे पुण्याचे काम करीत आहेत, हे काम मोठे असून आगामी काळात या कामाला आणखी चालना मिळावी याकरिता सोमनाथपुर येथील गोरक्षण संस्थेस आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही ना. बनसोडे यांनी दिली.
यावेळी रमेश अंबरखाने, राजेश्वर निटूरे, माजी आ. गोविंद केंद्रे, यांची मनोगते झाली. यावेळी श्री नवयुवक व्यापारी गणेश मंडळाची नूतन वर्षांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात प्रमुख मार्गदर्शक रमेश अंबरखाने, अध्यक्ष म्हणून रामदास जळकोटे, उपाध्यक्ष मोतीलाल डोईजोडे, सचिव प्रशांत मांगुळकर, सहसचिव गोपाळ मुक्कावार, कोषाध्यक्ष विजय मांगुळकर, सहकोषाध्यक्ष नरसिंग कंदले आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला श्री नवयुवक व्यापारी गणेश मंडळाचे सर्व सदस्य, नागरिक उपस्थित होते. या बैठकीचे प्रास्ताविक नरसिंग कंदले यांनी केले. सुत्रसंचलन श्रीपाद सिमंतकर यांनी तर आभार मोतीलाल डोईजोडे यांनी मानले.