भारत राठोड यांचा कार्यकाल सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल – डाॅ. तेलगाणे
उदगीर (एल.पी. उगिले) : उदगीर नगर पालिकेचे मुख्याधिकारी भारत राठोड यांनी कोरोणा काळात केलेली कामगिरी आणि सर्वसामान्य माणसांच्या सुखदुःखात धावून जाण्याची त्यांची वृत्ती, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू समजून त्यांनी उदगीर साठी केलेले एकूण काम हे उल्लेखनीय असून उदगीरकरांना अशा अधिकाऱ्याचा सार्थ अभिमान आहे. असे गौरवोद्गार राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा समाज प्रबोधनपर कीर्तनकार, प्रख्यात डॉक्टर शरदकुमार तेलगाणे यांनी काढले. भारत राठोड यांचा कोरोना योद्धा म्हणुन बारा बलुतेदार संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉक्टर तेलगाणे बोलत होते.
याप्रसंगी बारा बलुतेदार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर दापकेकर, बालाजी सुवर्णकार, प्रा. नरेंद्र कटारे,युवक काॅंग्रेसचे सोशल मिडिया प्रमुख अमोल घुमाडे, संजय पांचाळ, सामाजिक कार्यकर्त्या चंद्रकला बिरादार, व्ही.एस. बिरादार माळेवाडीकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉक्टर तेलगाने म्हणाले की, उदगीर शहर हे संत आणि महंत यांची पावन भूमी आहे. उदागीर बाबा, शाहमद कादरी यांची कर्मभूमी असल्याने ही पुण्यभूमी आहे. या ठिकाणी जो चांगले काम करतो, त्याचा गौरव करण्याची उदगीरकरांची परंपरा आहे. या परंपरेला साजेल असा हा कार्यक्रम असून, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना काळात कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीचा अंत्यविधी असेल किंवा उदगीर शहरात कोरोना येऊ नये म्हणून पहाटे पाच वाजल्यापासून शहराबाहेर वाहनांची तपासणी करण्याचे काम असेल! भारत राठोड यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यांच्या कामाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. असे सांगितले.
याप्रसंगी जिव्हाळा ग्रुपच्यावतीने हे बिरादार यांनी भारत राठोड यांचा योग्य सत्कार केला, तसेच त्यांना प्रतिमा भेट देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बालाजी सुवर्णकार यांनी केले.