ट्रॅक्टर चोरी प्रकरण ; आरोपींना मुद्देमालासह अटक
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील निखिल बारसमोर लावलेला जॉन डीअर कंपनीचा ट्रॅक्टर (एम एच २४ ए एस ६५३२) २ सप्टेंबरच्या रात्री चोरीस गेला होता. आरोपी उदगीरचे असल्याची गुप्त माहिती अहमदपूर डी. बी. पथकाला मिळाली. पथकाने उदगीरला जाऊन संबंधित आरोपीस शिताफीने पकडून, ट्रॅक्टरसंदर्भात विचारपूस केली असता परळी तालुक्यातील हेळंब शिवारात ट्रॅक्टर ठेवल्याची कबुली दिल. पथकाने ट्रॅक्टर चोरीतील दोन आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे.
२ सप्टेंबर रोजी शिरूर ताजबंद येथून जॉन डीअर कंपनीचा ट्रॅक्टर चोरी गेल्याची तक्रार ट्रॅक्टरचे मालक काशिनाथ तुकाराम हेंळबे यांनी अहमदपूर पोलीस ठाण्यात दिली होती. आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस आरोपीचा शोध घेत होते. सदर ट्रॅक्टर चोरणारा आरोपी शुक्रवार, २२ सप्टेंबर रोजी उदगीरला असल्याचे समजले. पोलीस निरीक्षक एस. आर. देडे यांच्या आदेशानुसार डी. बी. पथकाने कारवाई करत उदगीर येथून आरोपी करण वैजनाथ पल्ले (रा. संजय नगर उदगीर) यास ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीअंती त्याने आपल्यासोबत दुसरा साथीदार सुरेश रतन पवार (रा. डोंगरशेळकी ता. उदगीर) असल्याचे सांगितले. त्या दोघांनी ट्रॅक्टर चोरी केल्याचे कबूल केले. आरोपींनी चोरीचा ट्रॅक्टर हेळंब (ता. परळी जि. बीड) येथे ठेवल्याचे सांगितले. लागलीच दोन्ही आरोपींना सोबत घेऊन डी. बी. पथकाने हेळंब येथे जाऊन ट्रॅक्टर ताब्यात घेतले. आरोपींना तपासीक अंमलदार ठाकरे यांनी अटक केली आहे. अहमदपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. आर. देडे यांच्या नेतृत्वात पथकातील तानाजी आरदवाड, ठाकरे, जायभाये, बापू धुळगंडे, राजकुमार डबेटवार, रूपेश कजेवाड, पाराजी पुटेवाड, चोले यांनी कामगिरी बजावली.