स्त्रीवादी साहित्य प्रवाहाची निर्मिती ही काळाची गरज – डॉ. भारत हंडीबाग
अहमदपूर (गोविंद काळे) : साठोत्तरी काळात फुले- शाहू – आंबेडकरांच्या प्रेरणेतून दलित साहित्याने उसळी घेऊन समाजातील सर्व वंचित समूहांना अभिव्यक्त होण्याची प्रेरणा दिली. हजारो वर्षांची स्त्रियांची दुःखंही या निमित्ताने बाहेर पडली. स्त्रीवादी साहित्याचा नवा प्रवाह निर्माण झाला. हा प्रवाह निर्माण होणे ही काळाची गरज होती, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता तथा मराठी अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. भारत हांडीबाग यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि मराठी विभाग, महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्रात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध लेखक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते. तर बीज भाषक म्हणून पुणे येथील सुप्रसिद्ध सत्यशोधक विचारवंत तथा विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी उपस्थित होत्या. यावेळी पुढे बोलताना प्रा.डाॅ. भारत हंडीबाग म्हणाले की स्त्रियांचा फार मोठा वर्ग अजूनही मानसन्मानापासून वंचित असून, रूढी परंपरांच्या, अंधश्रद्धांच्या गर्तेत अडकलेला आहे. या वर्गाला बाहेर काढण्यासाठी स्त्रियांनी विपुल प्रमाणात विद्रोही साहित्य निर्माण केले पाहिजे, समाजाची दुःखं वेशीवर टांगली पाहिजेत, असेही ते म्हणाले.
यावेळी प्रा. प्रतिमा परदेशी म्हणाल्या की, अजूनही स्त्रियांचे शोषण विविध पातळ्यांवर होत असून, या शोषणाविरुद्ध तसेच जात वर्ग भांडवली व्यवस्थेविरुद्ध स्त्रियांनी आपल्या लेखणीतून यल्गार पुकारला पाहिजे. स्त्रियांनी आपल्या लेखणीतून सडेतोडपणे विचार मांडले पाहिजेत. या चर्चासत्रातील शोधनिबंध वाचनसत्राचे अध्यक्षस्थान मुंबई विद्यापीठातील मराठीच्या प्राध्यापक तथा ज्येष्ठ लोककला अभ्यासक, संशोधक प्रा. डॉ. श्यामल गरुड यांनी भूषविले. आपल्या भाषणात त्यांनी भारतीय स्त्रियांची सोशिकता हीच त्यांच्या दमनाला कारणीभूत असून स्त्रियांनी आपल्या भावभावनांची कोंडी न करता मुक्तपणे व्यक्त व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या चर्चासत्रात मुरुड येथील शिवाजी महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ .मनीषा झोंबाडे व कोसबाड टेकडी, डहाणू येथील डॉ . शशिकला पोतनीस कला वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अंजली सामंत यांनी अभ्यासपूर्ण शोध निबंधांचे वाचन केले. अध्यक्षीय समारोपात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी एकंदरीत मराठी साहित्यातील स्त्रियांच्या लेखनाचा आढावा घेत, साठोत्तरी काळातील लेखनाचे विशेष सांगितले. तसेच स्त्रीवादी लेखनाची गरजही त्यांनी आपल्या भाषणात प्रतिपादन केली.
यावेळी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व सचिव यांच्या शुभेच्छा संदेशांचे वाचन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले. चर्चासत्राचे प्रास्ताविक संयोजक डॉ. मारोती कसाब यांनी केले. सूत्रसंचालन सहसंयोजक प्रोफेसर डॉ. अनिल मुंढे यांनी केले, तर आभार मराठी विभागाची विद्यार्थिनी क्रांती राठोड हिने मानले. गुगलमीटवर झालेल्या या राष्ट्रीय चर्चासत्रात देशभरातून दोनशेहून अधिक संशोधक, अभ्यासक, विद्यार्थी, प्राध्यापक सहभागी झाले होते.