अहमदपूर; आगाराचे ९ लाखांचे उत्पन्न आले ५ लाखांवर

अहमदपूर; आगाराचे ९ लाखांचे उत्पन्न आले ५ लाखांवर

एसटीच्या फेऱ्यांना प्रवाशांचा प्रतिसाद

अहमदपूर( गोविंद काळे ) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अहमदपूर आगारातील एसटी फेऱ्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान पुणे,औरंगाबाद,बुलढाणा, सोलापूर, अक्कलकोटसह अन्य लांब पल्ल्याच्या मार्गावर प्रवासी उपलब्धतेनुसार बसेस सोडण्यात येत आहेत.लातूर जिल्ह्यत मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली होती. त्यामुळे राज्य शासनाने कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लागू केले होते. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीवर मर्यादा आल्या होत्या. लॉकडाऊन असल्याने तसेच कोरोनाच्या भीतीमुळे प्रवासीही घरा बाहेर पडत नव्हते. त्यामुळे एस.टी. महामंडळाने जिल्हा ते तालुका अशा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बसेस सुरू केल्या. आता तर कोरोनाची रुग्णसंख्या कमी होवू लागली आहे. त्यातच जिल्हा प्रशासनासह राज्य शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली.सध्या १०० टक्के प्रवासी वाहतुकीवर सार्वजनिक वाहतूक सुरू केली आहे. अहमदपूर आगारातून एसटी बससेवा सुरू करण्यात आली. मात्र, प्रवाशांचा सुरुवातीला म्हणावा तसा प्रतिसाद एसटीला मिळाला नाही. मात्र, सोमवार ७ जून पासून १०० टक्के आसन क्षमतेने वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे. औरंगाबाद,पुणे, स्वारगेट, सोलापूर, यासह अन्य मार्गावर अहमदपूर आगारातून बसेस सोडण्यात येत आहेत. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.गेल्या दीड महिना बसस्थानक परिसर प्रवाशांविना ओस पडला होता. आता मात्र बसस्थानक परिसरात प्रवाशांची गर्दी होत आहे. त्यामुळे हळूहळू बसस्थानक परिसरातील जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे.

अहमदपूर आगाराला दिवसाला ५ लाखांचे उत्पन्नगेल्या दोन वर्षापासून कोरोनाने अख्ख्या जगाला हैरान केले आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गतवर्षी आणि चालू वर्षात देखील टाळेबंदी करण्यता आली. त्याचा फटका सर्वच घटकांना बसला. महाराष्ट्राची लोकवाहिनी म्हणून परिचीत असलेल्या लालपरीला देखील तोटा सहन करावा लागला. आता गाडी रूळावर येत असून दिवसाला ५ लाखांचे उत्पन्न येत आहे.गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्राची लोकवाहिनी आणि लालपरी म्हणून परिचीत असलेली एसटी आजघडीला गावागावात पोहोचली आहे. एसटीचा प्रवास सुरळीत प्रवास म्हणून ओळखला जातो. त्यामुळे प्रवासी एसटीचा प्रवासाला पसंती देतात. राज्य शासनातर्फे नागरिकांकरिता एसटीत प्रवासाकरिता विविध सवलती देखील देण्यात येतात. विद्यार्थीनी करीता आणि दिव्यांग आणि वयोवृध्दांकरिता विशेष सवलत देण्यात येते. एसटी महामंडळाच्या सुरुवातीच्या काळापासून आतापर्यंत कधी एसटीची चाके थांबली नव्हती. मात्र कोरोना संक्रमण काळामुळे या लोकवाहिनीची चाके दोन वर्षात दोनदा दीर्घ काळासाठी थांबली. त्याचा फटका एसटी महामंडळाला बसला. आधीच अखेरची घरघर लागली असताना उत्पन्नाचे नवनवीन स्त्रोत शोधून खर्च भागविणाऱ्या एसटी महामंडळाला या दोन वर्षाच्या काळात आर्थिक चणचणीचा सामना करावा लागला. गतवर्षी आणि चालू वर्षात करण्यात आलेल्या लाकडाऊनमुळे अहमदपूर आगाराला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला. आता लॉकडाऊन शिथिल केल्याने अहमदपूर आगारातून दिवसाकाठी ३१२ फेऱ्या सोडण्यात येत असून सुमारे २१ हजार किलोमीटरचे अंतर आगारातील बस कापत आहेत. त्यातून दररोज सरासरी ५ लाख रूपयांचे उत्पन्न एसटी महामंडळाला मिळत आहे. अद्यापही प्रवासी पाहिजे, त्या प्रमाणात एसटीच्या प्रवासाकडे वळले नसल्याने आर्थिक घडी पूर्वपदावर येण्यासाठी वेळ लागणार आहे.

४९० कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला

अहमदपूर एसटी आगारात ४९० कर्मचारी कार्यरत आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या लॉकडाऊनच्या काळात आगारातील कर्मचाऱ्यांचे वेतन अनियमित झाले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक चणचण सहन करावी लागली. तर एसटीची चाके अशीच थांबून राहिल्यास आपली नोकरी देखील लॉकडाऊन उघडून परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने त्यांची भीती काहीअंशी कमी झाली आहे.

प्रतिसाद मिळेल तशी फेऱ्यांमध्ये वाढ अहमदपूर आगारातून ग्रामीण भागासह पूणे, शिवाजीनगर, स्वारगेट,औरंगाबाद, सोलापूर, बुलढाणा,अक्लकोट, गंगाखेड, मुखेड, उदगीर, लातूरसह एकूण ५८ बसेस मार्गस्थ आहेत. ३१२ फेऱ्या सुरू आहेत. सध्या तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने पेरणीचे कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. आणि पेरणी होताच प्रवाशांचा प्रतिसाद आणखीन मोठ्या प्रमाणात मिळणार आहे.लातूर जिल्हाअंतर्गत जिल्हा ते तालुका या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद मिळेल तशा बसच्या फेऱ्या वाढवण्यात येत आहेत.
एस.जी. सोनवणे, आगारप्रमुख अहमदपूर.

About The Author