पायीवारी सोहळा रद्द झाल्यामुळे वारकर्‍यांची घालमेल

पायीवारी सोहळा रद्द झाल्यामुळे वारकर्‍यांची घालमेल

भक्तितही कोरोना संसर्ग आडवा; सलग दुसर्‍यांदा वारी चुकल्याने मन खिन्न

उजना (गोविंद काळे) : वारकर्‍यांचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपुरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आस लागलेल्या वारकरी मंडळीना संत ज्ञानेश्वर पायी दिंडी सोहळा कोरोनाच्या संसर्गामुळे रद्द करण्यात आल्याने हिरमोड झाला आहे.
अहमदपुर तालुक्यातील शेकडो वारकरी दरवर्षी “भेटी लागी जिवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी” या श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे पांडुरंगाच्या दर्शनाची आस धरुन पायी वारी सोहळ्यात सहभागी होतात. तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक कुटुबांत पायी वारीची परंपरा आहे. दरवर्षी न चुकता पायी वारीत सहभागी होऊन आषाढी एकादशीला पांडुरंगाचे दर्शन घ्यायचेच असा नेम आहे. परंतु सलग दुसर्‍या वर्षीही कोरोनाच्या संसर्गामुळे पायी वारी रद्द होणार असल्याने वारकर्‍यांची घालमेल होताना दिसुन येत आहे.
पाऊस-पाणी, शेतीतील कामे असतानाही वारकरी पायी वारीला न चुकता जातात. पण पायी वारी चुकवण्याची सलग दुसर्‍यांदा वारकर्‍यांवर वेळ आल्याने वारकरी अस्वस्थ झाले आहेत.
“तुका म्हणे माझे लागलीसे भुक, धावुनी श्रीमुख दावी देवा” असे जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे. गतवर्षी प्रमाणेच यंदाही वारकरी पायी वारी सोहळ्याला मुकले असले तरीही, जगाच्या मालकाच्या दर्शनाची भुक विठ्ठलानेच मिटवावी असे वारकर्‍यांना वाटत आहे.
गतवर्षी प्रमाणे यंदाही वारी चुकणार असल्याने आत्ता “ठाईच बैसुनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा .” असे म्हणण्याची वेळ वारकर्‍यांना आली आहे.

प्रतिक्रीया
संताच्या सहवासात टाळ मृदंगाच्या तालावर संताचे अभंग, नाम गात जाण्यात जो आनंद आहे तो कुठेच मिळत नाही जसे दिवाळी सण जवळ आला कि लेकिला माहेरी जाण्याची ओढ लागते तसे आषाढी जवळ यायला लागली की वारकर्‍यांना पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागते. पण गेल्या वर्षी पासून कोरोनाच्या संसर्गामुळे पायी वारी झाली नाही. त्यावेळी सर्व नवीन असल्यामुळे सर्व वारकर्‍यांनी सरकारला सहकार्य केले. या वर्षी इतर सर्व व्यवहार सुरू झाले आहेत त्यामुळे पायी वारी करता येईल असे वाटत होते पण यंदा ही वारी पायी होणार नाही असे सरकारने जाहीर केले तेव्हा पासून वारकरी मंडळी अस्वस्थ झाले आहेत. सरकारने निर्बंध घालून पायी वारी साठी परवानगी द्यावी अशी मागणी करत आहोत. – भागवताचार्य ह.भ.प. कैलास महाराज मद्दे लिंगधाळकर

About The Author