अहमदपूर तालुक्यात काळ्या आईचा उत्सव पारंपारिक पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरा
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यात काळ्या आईच्या सन्मानाचा उत्सव असलेला वेळ अमावश्येचा सण गुरुवार ( दि 11) पारंपारिक पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा सण शेतकरी वर्गासाठी अत्यंत महत्वाचा आहे. अगदी सकाळ पासूनच शेताकडे जाण्यासाठी शेतकऱ्यांची कुटुंबासह घाई होती. आज सकाळपासून शहरांतून ग्रामीण भागाकडे जाणारे सर्वच रस्ते गर्दीने फुलले होते. परिणामी शहरांत दिवसभर शुकशुकाट होता. शेतकऱ्यांनी शेतात एक खोप (कोप) तयार करून त्याच ठिकाणी धान्याची आणि मांडलेल्या पांडवांची पूजा करून एका अर्थाने वनराईची भक्तीभावाने पूजा केली. या पुजेसाठी नैवाद्य ही खास असतो. त्यामध्ये , शेंगदाण्याचे लाडू, बोरे, जांभ, हरभऱ्याची ओली भाजी, ताक, लसूण व भाकरीच्या पीठापासून तयार केलेले अंबील, विविध भाज्या एकत्र करून तयार केलेली भज्जी आणि ज्वारी, गहू, बाजरीचे (सजगुर्याचे) उंडे याचा समावेश असतो. गोड पदार्थ म्हणून तिळगुळाची पोळी आणि गव्हाची खीर असते. त्याच प्रमाणे काही ठिकाणी पांढरी ज्वारी सडुन तयार केलेला आंबटभात ही असतो. आंबील वाटीत घेऊन शेतकरी भाऊ-भाऊ , पिता-पुत्र, आजा-नातू आदी पुऱूष पुजेभोवती प्रदिक्षणा घातल्या. यावेळी “इडापिडा टळू दे, बळीचं पाज्य येऊ दे” असा घोष करण्यात आला. या पुजेचे वैशिष्ठ म्हणजे यात कुठलेच पौराहीत्य नसतात. उघड्यावरच ज्योत पेटवली जाते. स्वत: बळीराजा ही पूजा करतो.
पूजा झाल्यानंतर आग्रहाने निमंत्रित केलेल्या मित्र, पाहून्यांच्या जेवणाच्या पंगती बसतात. त्यामुळे शनिवारी तालुक्यातील शेतशिवार माणसाने फुलून निघाला होता. वेळ अमावस्या निमित्त शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासह मित्र परिवार यांच्यासोबत वनभोजनाचा आस्वाद घेतला. वेळ अमावस्या मुळे अहमदपूर शहरासह तालुक्यात अघोषित संचारबंदी झाल्याची परिस्थिती होती.
रानमेव्याचा आस्वाद !
एरवी कधीतरी शेताकडे येणारी सर्व मंडळी या सणानिमित्त शेताकडे जातात. सध्या शेतात तुर, हरभरा, गहु, ज्वारी पिक असल्यामुळे त्यांनी तुरीच्या शेंगा, ढाळे, वाटान्याच्या शेंगा, ऊस, गव्हाच्या ओम्ब्या यासह बोरं या रान मेव्याचा आस्वाद घेतला. तसेच काही हौसी लोकांनी शेतातील मोहाळाची शिकार करून त्याच्या मधाचा आस्वाद घेतला. या दिवशी सायंकाळी कडब्याच्या पेटत्या पेंड्या हातात घेऊन शेतक–यांकडून आपापल्या शेताला प्रदक्षिणा घातली. यामुळे पिकावर रोगांचा प्रार्दुर्भाव होत नाही अशी धारणा आहे.
अमावस्या सणाची संस्कृती
मुळ कर्नाटकातील असणारा वेळ अमावास्या हा सण महाराष्ट्रातील लातुर जिल्ह्यासोबत शेजारील तालुक्यांमध्ये मार्गशीर्ष अमावस्या म्हणजेच वेळ अमावस्या मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. ही आमावस्या दर्शवेळा अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. मूळ कानडी शब्द “येळ्ळ अमावस्या” म्हणजे पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या म्हणजे येळी अमावस्या, याचाच अपभ्रंश होऊन वेळ अमावस्या शब्द रुढ झाला. शहरी भागातील लोकांसाठी तर हा सण म्हणजे पर्वणी असतो. त्यामुळे या दिवशी सर्व जण आवर्जून येतात. व या सणाचा आनंद घेतात.