कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा गोळीबारात मृत्यू
पुणे (केशव नवले) – पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोथरूड परिसरातील सुतारदरा येथे भर दिवसा त्याच्यावर तीन ते चार हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या होत्या. त्यातील एक गोळी त्याला लागली होती.
शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तीन ते चार हल्लेखोरांनी शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी त्याच्या खांद्याला लागली. जखमी शरद मोहोळ याला कोथरूड परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान आज शुक्रवार दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिस घटनास्थळी दाखल झाले व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. त्यावरून आरोपींची ओळख पटवून आरोपींचा माग काढण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे.
शरद मोहोळ हा पुणे येथील कुख्यात गुंड होता. मुळशी तालुक्यातील एका सर्वसामान्य कुटुंबात तो वाढला होता. गुंड संदीप मोहोळ याचा ड्रायव्हर म्हणून त्याने गुन्हेगारी क्षेत्रात पदार्पण केले होते. संदीप मोहोळ याची हत्या झाली. त्यानंतर शरद याने स्वतःची गुन्हेगारी टोळी बनवून गुन्हे करण्यास सुरुवात केली. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यांसारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. टोळीयुद्धातून त्याने साथीदारांसोबत गणेश मारणे टोळीतील पिंटू मारणे याचा खून केला होता. त्यात त्याला अटक झाली होती. त्या खटल्यात त्याला जामीन मिळाला असता त्याने लवासा प्रकरणातील दासवे येथील सरपंच शंकर धींडले यांचे अपहरण केले होते. त्या गुन्ह्यात देखील त्याला पुन्हा अटक झाली होती.
एका गुन्ह्यात येरवडा कारागृहात असताना त्याने कातील सिद्दिकी याचा खून केला होता. कातील सिद्धिकी हा दहशतवादाच्या आरोपावरून येरवडा कारागृहात होता. त्याच्यासोबत किरकोळ कारणावरून वाद झाल्याने शरद मोहोळ याने त्याचा खून केला होता. सिद्दिकी खून खटल्यात पुराव्याअभावी त्याची निर्दोष सुटका झाली होती. सन 2022 मध्ये त्याला पुणे पोलिसांनी सहा महिन्यांसाठी तडीपार देखील केले होते.
शरद मोहोळ याच्या लग्नाचा शुक्रवारी वाढदिवस होता. तो घरी असताना काही हल्लेखोर त्याच्या गल्लीत दबा धरून बसले होते. घरातून बाहेर येताच हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी हा प्रकार घडला आहे.