मराठा आरक्षणाचे अपयश लपविण्‍यासाठी ठाकरे सरकारने ओबीसीचे आरक्षण घालविले

मराठा आरक्षणाचे अपयश लपविण्‍यासाठी ठाकरे सरकारने ओबीसीचे आरक्षण घालविले

राज्‍यभर २६ जूनला चक्‍काजाम आंदोलन – भाजपाचे योगेश टिळेकर

लातूर (प्रतिनिधी) : गेल्‍या दिड वर्षात राज्‍यातील महाविकास आघाडीचे सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरले असून कोणताच समाज या सरकारच्‍या काळात समाधानी नाही. मराठा समाजाला मिळालेले आरक्षण रद्द झाले. ठाकरे सरकारला आलेले हे अपयश लपविण्‍यासाठी त्‍यांनी ओबीसीचे आरक्षण घालविले असा घणाघाती आरोप करून ओबीसीचे आरक्षण सन्‍मानाने परत मिळावे यासाठी येत्‍या २६ जून रोजी राज्‍यभर भाजपाच्‍या वतीने चक्‍काजाम आंदोलन करण्‍यात येणार असल्‍याची माहिती भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्‍यक्ष योगेश टिळेकर यांनी दिली.

लातूर जिल्‍हयातील भाजपाच्‍या लोकप्रतिनिधीसह ओबीसी मोर्चाच्‍या पदाधिकाऱ्यांची बैठक ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्‍यक्ष योगेश टिळेकर यांच्‍या प्रमुख उपस्थितीत आणि भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांच्‍या अध्‍यक्षतेखाली लातूर येथे सोमवारी झाली. या बैठकीस औश्‍याचे आ. अभिमन्‍यू पवार, प्रदेश प्रवक्‍ते गणेशदादा हाके, माजी आमदार गोविंदअण्‍णा केंद्रे, शिवाजीराव पाटील कव्‍हेकर, बब्रुवान खंदाडे, शहर जिल्‍हाध्‍यक्ष गुरूनाथ मगे, जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष राहूल केंद्रे, सभापती गोविंद चिलकुरे, रोहिदास वाघमारे, सांस्‍कृतिक सेलचे प्रदेशाध्‍यक्ष शैलेश गोजमगुंडे, जिल्‍हा संघटन सरचिटणीस संजय दोरवे, त्र्यंबकआबा गुटे, प्रा. विजय क्षीरसागर, अशोकराव केंद्रे, ओबीसी मोर्चाचे मराठावाडा संपर्कप्रमुख डॉ. बाबासाहेब घुले, शरद पेठकर, जिल्‍हाध्‍यक्ष बापूराव राठोड, दिपाताई गिते, जयश्रीताई पाटील, स्‍वाती जाधव, ज्ञानेश्‍वर चेवले, दिलीप धोत्रे, मनिष बंडेवार यांच्‍यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.

आरक्षण हा समाजाचा नव्‍हे तर जिव्‍हाळयाचा प्रश्‍न आहे. विकासाची गंगा शेवटच्‍या माणसांपर्यंत पोंहचली पाहिजे हाच भाजपाचा मुळ विचार असल्‍याचे सांगून योगेश टिळेकर म्‍हणाले की, राज्‍यातील महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार गेल्‍या दिड वर्षात सर्वच क्षेत्रात अपयशी ठरले आहे. या सरकारच्‍या काळात कोणीच समाधानी नाही. विकास कामांना स्‍थगिती देणाऱ्या या सरकारने वसूलीचे मात्र मोठे काम केले आहे.

छत्रपती शाहू महाराजांनी मागे असलेल्‍या समाजाला पुढे आणण्‍यासाठी आरक्षण देवून सन्‍मान केला. मात्र राज्‍यात ५२ टक्‍के असलेल्‍या ओबीसी समाजाचे आरक्षण सुप्रिम कोर्टात राज्‍य शासनाने दुर्लक्षित करून वेळ काढू भूमिका घेतल्‍याने ओबीसीचे आरक्षण रद्द झाले. एस.सी. आणि एस.टी. समाजातील पदोन्‍नतीचे आरक्षण ठाकरे सरकारने रद्द केले असल्‍याचे सांगून योगेश टिळेकर म्‍हणाले की, गेल्‍या चाळीस वर्षापासून आरक्षणासाठी मराठा समाज झगडत होता. मराठा समाजाच्‍या अनेक नेत्‍यांनी सत्‍तेचा उपभोग घेतला मात्र देवेंद्र फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वातील भाजपा सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले आणि उच्‍च न्‍यायालयात टिकविले. राज्‍यात सत्‍तेवर आलेल्‍या ठाकरे सरकारने सुप्रिम कोर्टात योग्‍य पध्‍दतीने बाजू मांडली नसल्‍याने हे आरक्षण रद्द झाले. मराठा आरक्षणाचे अपयश लपविण्‍यासाठीच ओबीसीचे आरक्षण या सरकारने घालविले.

आरक्षण प्रश्‍नासंदर्भात संघर्ष नाही केला तर येणारी पिढी माफ करणार नाही. त्‍याचबरोबर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्‍हा परिषद, नगरपालिका यासह कोणत्‍याच स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेच्‍या येत्‍या काळात होणाऱ्या निवडणूकीत ओबीसीचा उमेदवार दिसणार नाही. राज्‍यातील ३५० जातीतून एकही व्‍यक्‍ती निवडणूकीसाठी उभा राहता कामा नये हाच हेतू राज्‍य सरकारचा दिसून येतो. मात्र जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत निवडणूका घेवू नयेत हीच भाजपाची भूमिका असल्‍याची माहिती योगेश टिळेकर यांनी दिली.

सत्‍तेतील मंत्री विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ यासह इतर अनेकजण ओबीसीच्‍या आरक्षण संदर्भात निर्णय घेण्‍याचा अधिकार असताना नौटंकी करत आहेत. आरक्षण रद्द झाल्‍याची जबाबदारी स्विकारून त्‍यांनी आपल्‍या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करून ओबीसीचे आरक्षण सन्‍मानाने परत द्यावे यासाठी राज्‍यभर येत्‍या २६ जून रोजी चक्‍काजाम आंदोलन करून ओबीसीचा आक्रोश व्‍यक्‍त केला जाणार आहे. तेव्‍हा सर्वांनी या आंदोलनात सहभागी होवून सरकार विरूध्‍द जनशक्‍तीची ताकद दाखवून द्यावी असे आवाहन योगेश टिळेकर यांनी केले.

या बैठकीत बोलताना जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड म्‍हणाले की, लोकनेते स्‍व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब आज असते तर ओबीसीचे आरक्षण रद्दच झाले नसते असे सांगून लातूर जिल्‍हा हा भाजापाचा बालेकिल्‍ला आहे. या जिल्‍हयातील सर्वच विधानसभेत भाजपाचे हे चक्‍काजाम आंदोलन राज्‍याचे लक्ष केंद्रीत करणारे आक्रमक मोठया ताकतीने होईल हे आंदोलन ओबीसीचेच नव्‍हे तर भाजपाचे आहे. त्‍यामुळे सर्वांनी या चक्‍काजाम आंदोलनात मोठया संख्‍येनी सहभागी व्‍हावे असे आवाहन केले.

प्रारंभी देविदास काळे यांनी प्रास्‍ताविक केले तर शेवटी ओबीसी मोर्चाचे जिल्‍हाध्‍यक्ष बापुराव राठोड यांनी आभार मानले. या बैठकीस भागवत सोट, उषा रोडगे, सुभाष जाधव, सुरेंद्र गोडभरले, दिग्‍वीजय काथवटे, मिनाताई सुर्यवंशी, संध्‍या जैन, वसंत करमुडे, राजेश वाघमारे, पद्माकर चिंचोलकर, तात्‍याराव बेद्रे, ललिता कांबळे, सुरेखा पुरी, शिवा सिसोदिया, बन्‍सी भिसे, प्रशांत पाटील, अरविंद नागरगोजे, काशिनाथ गरीबे, मनोहर पटणे, सुनिल पाटील, संतोष मुक्‍ता, बाळासाहेब होळकर, शिवाजी बैनगिरे, हणमंत देवकते, सुरेश बुड्डे, काशिनाथ ढगे, राजकिरण साठे यांच्‍यासह जिल्‍हाभरातील भाजपाचे लोकप्रतिनिधी, ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी, मोठया संख्‍येने उपस्थित होते.

About The Author