लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित लालबहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रीमती निताताई वट्टमवार, माधव केंद्रे व विभाग प्रमुख सुधाकर पोलावार उपस्थित होते.व्यासपीठावरील मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिप प्रज्वलन करण्यात आले.गुलाब पुष्प देऊन शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
प्रमुख अतिथी श्रीमती निताताई वट्टमवार यांनी बाल शिवबांच्या जडणघडणीमध्ये मोलाची भूमिका निभावणाऱ्या थोर माता,राजमाता जिजाऊ यांच्या बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.जिजाऊंनी शिवरायांना श्रीकृष्ण, श्री राम,अभिमन्यू व महाराणा प्रताप यांच्या गोष्टी सांगून अन्यायाविरुद्ध चिड निर्माण केली व स्वराज्याची प्रेरणा दिली.शिवरायांच्या मनात देशभक्ती व स्रियांचा सन्मान या चांगल्या गोष्टी रुजवल्या.
दुसरे प्रमुख वक्ते माधव केंद्रे यांनी थोर पुरुष,हिंदूधर्माचे प्रसारक,विचारवंत स्वामी विवेकानंद यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग गोष्टीरुपात सांगितले.त्यांचे अनमोल विचार सर्व विद्यार्थ्यांनी वाचून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्याविषयीच्या संस्कार कथा वाचाव्यात,असे मार्गदर्शन केले.
कु.श्रावणी पांडुरंग गंगणे या मुलीने राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श राजा बनवण्यासाठी बालपणीच चांगले संस्कार केले होते.आपणही संस्करक्षम होवूया.असे सांगितले.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्यातून त्यांच्यातील गुण आत्मसात करावे.त्यांच्याविषयीचे साहित्य मिळवून वाचन करावे व समाजासाठी,देशासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.सुत्रसंचलन सौ.मंजुषा पेन्सलवार यांनी केले तर,आभार सौ.दिपाली भावसार यांनी मानले.