आशा स्वंयसेविका यांच्या मागण्या मान्य करा – आमदार बाबासाहेब पाटील

आशा स्वंयसेविका यांच्या मागण्या मान्य करा - आमदार बाबासाहेब पाटील

आमदार बाबासाहेब पाटील यांची पत्रकाद्वारे मुख्यमंत्र्याकडे मागणी

अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्यातील सुमारे 70 हजार आशा स्वंयसेविका व 4000 गट प्रवर्तक यांच्या मागण्या मान्य करण्याचे निवेदन आमदार बाबासाहेबजी पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना दिले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आशा सेविका जोखीम पत्करून जिल्ह्यात कोरोनाच्या लढाईत स्वतःचा जीव धोक्यात घालून अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या आशा सेविकांना त्यांच्या
कामाची दखल घेऊन त्यांच्या विविध मागण्या मान्य करा.

संवादा दरम्यान आशा सेविकांनी आपल्या अडचणी मांडल्या होत्या. कामाचा प्रचंड ताण व अहोरात्र परिश्रम करत असतानाही त्या बदल्यात मानधन मात्र अतिशय तुटपुंजे मिळते, परिणामी घर खर्च भागवणे अशक्य असल्याचे सांगत मानधनात वाढ करण्याची मागणी त्यांनी केली होती. तसेच आठ महिन्याची गरोदर आशा सैनिकांना बालसंगोपन रजा देण्याची कायदेशीर तरतुद नसल्याचे व तीन महिन्यांपेक्षा जास्त सुट्टी घेता येत नसल्याने मोठी गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. याबाबत प्रशासनाकडे आपण व्यक्तिशः पाठपुरावा करत आहे.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यात ग्रामीण भागात गाव पातळीवर काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी खूप जिद्दीने यामध्ये काम केलेले आहे. एक ते दीड वर्षापासून आजपर्यंत त्या सातत्याने सर्वेक्षण करणे, विलगीकरणास भेटी देणे, कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्यास तात्काळ भेटी देणे, 14 दिवस सर्वेक्षण करून रुग्ण शोधणे, अशाप्रकारची महत्वाची कामे पार पाडली आहेत. त्यांची ही कामे अद्यापही सुरूच आहेत. या कामासाठी आशांना नियमित मानधन दिले जात नाही. कामावर आधारित मोबदला दिला जातो. त्यांना अत्यंत तुटपुंजे मानधन आरोग्य विभागाकडून मिळत होते. ही बाब विचारात घेऊन व त्यांच्या कामाची दखल घ्यावी. याच धर्तीवर आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्या मागण्या मान्य करावे अशी विनंती आमदार बाबासाहेबजी पाटील यांनी मुख्यमंत्र्याकडे केली.

About The Author