फैज़-ए-आम ट्रस्टच्या वतीने अहमदपुर शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
अहमदपूर (गोविंद काळे) : फैज़ ए आम चॅरिटेबल ट्रस्ट ही एक अशी ट्रस्ट आहे जी फक्त सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असते.या ट्रस्टचा प्रत्येक सभासद जीव ओतून प्रामाणिक कार्य करतोय आणि तेही पूर्णतः स्वतःच्याच सहभागातून हे उल्लेखनीय आहे.मागील काही वर्षांपासून मीही या ट्रस्टच्या प्रत्येक कार्यक्रमाचा अनुभव घेतलोय, कुठल्याही प्रसिद्धीविना यांचे कार्य निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन अहमदपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मनिष कल्याणकर यांनी केले.
ते आज अहमदपूर येथील अब्दुल गणी काॅंपलेक्स येथे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त फैज ए आम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबीराच्या उद्घाटन समयी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अन्वर जमाखां अख्तर जमाखां पटेल, पोलिस निरीक्षक सुधाकर देडे,नगर परिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक करीमसाब पठाण, मुफ्ती मोहम्मद फाजीलसाब, हाफीज खुर्शीद साहब,सामाजिक कार्यकर्ते मोहसीन बायजीद,रजाअलीखां लष्करी, हरिदास तम्मेवार,एन.डी.राठोड आदींची उपस्थिती होती.
याबाबत अधिक माहिती अशी की.अहमदपूर येथे फैज ए आम चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था मागील तीन वर्षांपासून प्रजासत्ताक दिनानिमित्त नियमितपणे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करते.या संस्थेअंतर्गत अहमदपूर येथे मागील आठ वर्षांपासून विविध प्रकारच्या सामाजिक कार्याचे आयोजन नियमितपणे राबवले जातात जसे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके यांचे वाटप,अनाथ मुलींच्या विवाहासाठी आर्थिक मदत देणे, गरीब व्यक्तींना आजारपणात मदत करणे, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करणे, करिअर मार्गदर्शन करणे असे सामाजिक उपक्रम राबविले जातात.
यावेळी मोहसीन बायजीद यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले तर अध्यक्षीय समारोप अन्वर पटेल यांनी केले.आज झालेल्या रक्तदान शिबीराच्या स्थळी विविध राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी भेट देऊन ट्रस्टचे कौतुक केले यामध्ये राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव, आमदार बाबासाहेब पाटील, माजी मंत्री विनायकराव पाटील,साजिदभाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष सय्यद साजिदभाई,माजी उपनगराध्यक्ष कलीमोद्दीन अहमद,प्रशांत भोसले, शिवाजीराव देशमुख, राहूल शिवपूजे, डॉ पांडुरंग कदम, डॉ वैभव रेड्डी, सत्यनारायण काळे,मोहिब कादरी आदींनी सदिच्छा भेट दिली. यावेळी रक्त संकलनाचे काम शासकीय रुग्णालय लातूर आणि लातूर ब्लड बँक लातूर यांनी केले.या रक्तदान शिबीरात 155 रक्तदात्यांनी रक्तदान केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हाफीज खुर्शीद साहब यांनी केले तर आभार सय्यद नजीब यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फैज ए आम चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.