जलसंधारणाची कामे करुन मतदार संघात हरित क्रांती केली : ना. संजय बनसोडे
उदगीर (एल.पी.उगीले) : आपला भाग हा दुष्काळी असल्याने या भागात पाण्याचे प्रमाण कमी होते. या भागाचा अभ्यास करुन एक मास्टर प्लाॅन तयार केला. या परिसरात मागील ४० वर्षापूर्वी बंधारे झाले होते. त्याची अतिशय दुरावस्था झाल्याने या भागातील शेतक-यांना त्याचा फायदा होत नव्हता हि बाब लक्षात आल्यानंतर उदगीर तालुक्यातील कासराळ – ३, सुमठाणा – २ , वाघदरी – २, टाकळी – २, कौळखेड – १ , चांदेगाव – १ असे एकुण ११ कोल्हापुरी बंधारे मंजूर करुन घेतले त्यात आरनाळ येथील एका साठवण तलावाचाही समावेश आहे १ साठवण तलाव व ११ कोल्हापुरी बंधाऱ्यासाठी एकुण ३० कोटी ६८ लक्ष रुपयाचा निधी मंजूर केला आहे. या बंधाऱ्यामुळे उदगीर तालुक्यातील ४५० हेक्टर क्षेत्र हे सिंचनाखाली येणार असुन या भागातील पाणीटंचाई ही कमी होणार आहे. या कोल्हापुरी बंधाऱ्यांमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती होवुन त्यांचे जीवनमान उंचावेल म्हणून जलसंधारणाची कामे करुन मतदार संघात हरित क्रांती केली असल्याचे मत क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने आयोजीत उदगीर तालुक्यातील मौजे कासराळ येथील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या भुमीपुजन सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
यावेळी उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार रामेश्वर गोरे, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, महावितरणचे सायस दराडे, वाढवणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.एस. गायकवाड, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल कांबळे, कासराळचे सरपंच दयासागर यल्लावाड, ज्ञानोबा शेळके, सुरेखा पाटील, भरत चामले, ब्रम्हाजी केंद्रे, माजी नगरसेवक अनिल मुदाळे, सय्यद जानीमियाँ, फय्याज शेख, इब्राहिम पटेल, बाळासाहेब मरलापल्ले, नवनाथ गायकवाड, शशिकांत बनसोडे, नागेश थोंटे, संजय पवार, बालाजी भोसले, बस्वराज रोडगे, प्रशांत चामे, प्रभाकर पाटील, वसंत पाटील आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी,
मतदार संघात नागरीकांना लागणा-या सर्व सुख – सुविधा उपलब्ध करुन देवुन उदगीरच्या विकासाचा नवा पॅटर्न महाराष्ट्रात निर्माण केला. आणखी नविन ७ कोल्हापुरी बंधारे मंजूर केले असुन यामध्ये धडकनाळ – २ , बोरगाव – १, लिंबगाव – १ देवर्जन – १ नळगीर – १, नागलगाव – १ असा एकुण ७ कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी १० कोटी ६९ लक्ष रुपये मंजूर केले असुन त्याची निविदा प्रक्रिया चालु आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याचेही ना.संजय बनसोडे यांनी सांगितले.
मतदार संघात जलसंपदा विभागातुन सिंचनाचे प्रश्न सोडवले आहेत. त्यामध्ये आजपर्यंत ६० कोटींची कामे झाली असुन
१४२ कोटींची कामे अजुन प्रस्तावित आहेत. मंजूर झालेली सर्व कामे वेळेत व दर्जेदार करण्याचे निर्देश ही ना.बनसोडे यांनी दिले.
गाव समृध्द झाले तर तालुका समृध्द व जिल्हा मग महाराष्ट्र राज्य त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येवून आपल्या भागाचा विकास करावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.श्याम डावळे यांनी केले तर आभार गोपाळ पाटील यांनी मानले.
यावेळी नागलगाव, टाकळी, चांदेगाव, लिंबगाव, वागदरी, धडकनाळ, बोरगावसह परिसरातील ग्रामस्थ व प्रतिष्ठित नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.