आणखी एक भू-माफिया,सराईत गुन्हेगार लातूर जिल्ह्यातून हद्दपार
लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेला अडचण ठरणारे, गुन्हेगारी स्वरूपाचे कार्य करणारे व्हाईट कॉलर क्रिमिनल्स शोधून त्यांच्यावर योग्यती कारवाई करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सूचना दिल्या होत्या त्यानुसार सराईत गुन्हेगारी करणारा भूमाफिया त्याला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
याबाबत याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस ठाणे लातूर ग्रामीण तसेच लातूर शहरातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या व जमिनीवर बेकायदेशीर कब्जा करून जमिनी बळकाविण्याचा प्रयत्न करणाऱ्या भूमाफिया,सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीची (तडीपार) कारवाई करण्यात आली असून हद्दपारची कारवाई करण्यात आलेल्या इसमाचे नाव गोपाळ गोविंद लकडे, (वय ४३ वर्ष, राहणार बोरवटी, तालुका जिल्हा लातूर) असे आहे. त्यांच्यावर सन 2019 ते 2023 कालावधीमध्ये मारामारी , दुखापत करणे, गैर कायद्याचे मंडळी जमून मारामारी करणे, महिलांचे विनयभंग करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, घरात घुसून मारहाण करणे, एकाच जागेची परत-परत विक्री करून फसवणूक करणे, तोतयागिरी करून ठकवणूक करणे, बनावट शासकीय दस्तऐवज तयार करणे, यासारखे गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यामुळे सामाजिक शांतता धोक्यात आली होती.
आगामी सणउत्सव, निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात शांतता अबाधित राहावी, तसेच भूमाफियांच्या अवैध कृतीला प्रतिबंध करण्यासाठी, नमूद सराईत गुन्हेगार याचे कडून कोणत्याही प्रकारचे गैरकायदेशीर कृत्य घडू नये, याकरिता लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार मालमत्ता विषयी व शरीराविषयी गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून नागरिकांची व शासनाची फसवणूक करणाऱ्या गुन्हेगाराला एक वर्षासाठी हद्दपार (तडीपार) करण्यात आले आहे.
यासंदर्भात पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांना सदर सराईत आरोपी विरुद्ध उपविभागीय दंडाधिकारी, लातूर रोहिणी न-हे विरोळे यांच्याकडे पाठविण्यात आलेल्या हद्दपारिच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यासंदर्भात आदेशित केले होते. त्यावरून अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले व पोलीस ठाणे लातूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, तत्कालीन पोलीस निरीक्षक गणेश कदम व त्यांच्या टीम मधील पोलीस उपनिरीक्षक तानाजी पाटील, पोलिस अमलदार प्रदीप स्वामी, राहुल दरोडे, सचिन चंद्रपाटले, सतीश लामतुरे यांनी नमूद सराईत आरोपी विरुद्ध सविस्तर हद्दपारचा प्रस्तावाचा पाठपुरावा करून उपविभागीय दंडाधिकारी लातूर यांचे कार्यालयात सुनावणी अंति नमूद आरोपीस मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56(1)अन्वये एक वर्षासाठी लातूर जिल्ह्यातून हद्दपार (तडीपार) करण्यात आले आहे.
आगामी काळात साजरे होणारे सण-उत्सव व येणारे काळात होऊ घातलेल्या निवडणुकांचे अनुषंगाने त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 (1) प्रमाणे कार्यवाही करून सदर सराईत गुन्हेगाराला लातूर, जिल्ह्यातून तसेच कळंब,अंबाजोगाई, उस्मानाबाद तालुक्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
सदर कारवाईच्या माध्यमातून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या, शासनाची व नागरिकांची फसवणूक करून जमिनी बळकावणाऱ्या भूमाफिया व सराईत, उपद्रवी गुन्हेगाराला जिल्ह्यातून हद्दपार केल्यामुळे इतर गुन्हेगारीकृत्य करणाऱ्यां गुन्हेगारांना,भू-माफियाना चांगलाच दणका बसला आहे.