विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी शासन शिष्यवृत्तीत वाढ व्हावी – प्रा. सुभाष भिंगे
लातूर (प्रतिनिधी) : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे तेव्हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी त्याला शासनामार्फत मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत वाढ व्हावी असे प्रतिपादन दयानंद कला महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक सुभाष भिंगे यांनी बोलताना व्यक्त केले.
महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थी शिष्यवृत्ती जाणीव जागृती कार्यक्रमांमध्ये ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई हे होते तर प्रमुख वक्ते डॉ. हर्षवर्धन कोल्हापुरे, उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, कॅप्टन डॉ. बाळासाहेब गोडबोले, डॉ. विनायक वाघमारे, डॉ. यशवंत वळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना प्रा. सुभाष भिंगे म्हणाले की, पूर्वी विद्यार्थी शिष्यवृत्ती संबंधी आंदोलन करीत होते. सन १९७२ला डॉ. कुमार सप्तऋषी यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्यवृत्ती वाढीचे फार मोठे आंदोलन झाले होते मात्र आज असे होताना दिसत नाही. विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक होणे अत्यंत आवश्यक आहे. शिष्यवृत्ती किती मिळते यापेक्षा ती मिळावी यासाठी विद्यार्थ्यांनी अधिक प्रयत्न केला पाहिजे. तो एक आपला अधिकार आहे याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी डॉ. हर्षवर्धन कोल्हापुरे म्हणाले की, आज महात्मा बसवेश्वर महाविद्यालयांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संबंधी कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांनी उपस्थितांचे अभिनंदन केले. आज विद्यार्थी आत्महत्या करीत आहे ही एक चिंताजनक बाब आहे. शिष्यवृत्ती ही शैक्षणिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असते. तेव्हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारने आपल्या अंदाजपत्रकामध्ये यासाठी भरीव तरतूद करावी त्यामुळे गरीब आणि होतकरु विद्यार्थ्यांना त्याचा अधिक लाभ होईल असेही ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाचा अध्यक्षिय समारोप महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅप्टन डॉ. बाळासाहेब गोडबोले यांनी केले तर आभार डॉ. रत्नाकर बेडगे यांनी मानले.
यावेळी डॉ. शिवप्रसाद डोंगरे, प्रा. आशिष स्वामी, प्रा. मारुती माळी, प्रा. शंकर भोसले, , डॉ. राहुल डोंबे, डॉ. गिता गिरवलकर, कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे, यशपाल ढोरमारे यांच्यासह कला, वाणिज्य, विज्ञान, समाजकार्य व संगणकशास्त्र शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष येचवाड, बालाजी डावकरे, नंदू काजापुरे, जलील सय्यद आदींनी परिश्रम घेतले.