स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी, 4 मोटरसायकल जप्त. 1आरोपी अटक
लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने चोरीच्या मोटरसायकली जप्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या पथकाने एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून चार चोरलेल्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते. पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषतः मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते .
त्या अनुषंगाने सदर पथके माहितीचे संकलन करीत असताना, माहिती घेत असताना दिनांक 14/02/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील दोन गुन्हेगार चोरलेली मोटरसायकल विकण्यासाठी बाभळगाव चौक परिसरात फिरत आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने दिनांक 14/02/2024 रोजी सदर पथक तात्काळ बाभळगाव चौक परिसरात पोचून रोडवर मोटार सायकलसह थांबलेल्या इसमाला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव मोईन अकबर चौधरी, (वय 22 वर्ष, राहणार चिल्ले कॉम्प्लेक्स जवळ, शास्त्रीनगर लातूर). असे असल्याचे सांगितले.
तसेच त्यांच्या ताब्यात असलेल्या वाहना संदर्भाने विचारपूस केली असता सांगितले कि, सदरची मोटरसायकल काही महिन्यापूर्वी बाभळगाव रोड वरील एका पेट्रोल पंपा समोरून मी व एक अल्पवयीन बालक असे दोघे मिळून चोरी केलेली आहे. तसेच आरोपी नामे अखिल महबूब शेख, (राहणार परळी जिल्हा बीड). याने कोठून तरी चोरून आणलेल्या आणखीन तीन मोटारसायकली विकण्यासाठी आमच्याकडे दिलेल्या असल्याचे सांगितले व ते काढून दिल्याने त्या मोटरसायकली नमूद आरोपीकडून जप्त केले आहे.नमूद आरोपीकडून चोरीच्या मोटारसायकली ज्याची एकूण किंमत 2 लाख 50 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पोलीस ठाणे विवेकानंद चौक तसेच पोलीस ठाणे बीड शहर येथील प्रत्येकी एक असे एकूण दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
नमूद आरोपीला पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे पुढील कार्यवाहीस्तव ताब्यात देण्यात आले असून संबंधित पोलीस ठाणेचे पोलीस पुढील तपास करीत आहेत. बीड येथील आरोपीचा शोध सुरू आहे.सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे मार्गदर्शनात पोलीस अंमलदार नितीन कटारे, राहुल सोनकांबळे, साहेबराव हाके, राजेश कंचे, मनोज खोसे, राहुल कांबळे यांनी पार पाडली.