संत सेवालाल यांचे व्यक्तिमत्व म्हणजे अहिंसा , पर्यावरण संवर्धन आणि अध्यात्माचा त्रिवेणी संगम – डॉ. अनिल मुंढे
अहमदपूर (गोविंद काळे) : मध्ययुगीन भारतातील थोर प्रबोधनकार आणि अहिंसावादी महान तत्त्वज्ञ संत सेवालाल महाराज यांनी समाजाला पर्यावरण, अहिंसासह अध्यात्माचे शिक्षण देण्याचे कार्य केले असे प्रतिपादन अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयातील मराठी विभागातील ह. भ. प प्रोफेसर डॉ. अनिल मुंढे महाराज यांनी केले .
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या संत सेवालाल महाराज यांच्या जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ह. भ. प. डॉ. अनिल महाराज मुंढे महाराज उपस्थित होते. यावेळी पुढे बोलतांना ह. भ. प. डॉ. अनिल महाराज मुंढे म्हणाले की, संत सेवालाल महाराजांनी अठराव्या शतकात समाजाला पर्यावरणाचे महत्त्व सांगितले होते. तसेच अंधश्रद्धा आणि व्यसनाधीनता या दुर्गुणांना नाकारून मानवाने नेहमी सत्याने आणि नीतीने वागावे असे सांगितले होते असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोपाप्रसंगी बोलतांना उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी म्हणाले की, संत सेवालाल महाराजांनी आपल्या वाणीतून आणि प्रत्यक्ष कृतीतून समाजाला समता , स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्व, मैत्र अशा आदर्श जीवन मूल्यांची शिकवण दिली असून, आजही त्यांच्या विचारांची समाजाला गरज असल्याचे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले, तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले.या वेळी प्रो. डॉ. नागराज मुळे, प्रो. डॉ. अभिजित मोरे, डॉ. मारोती कसाब, प्रशांत बिरादार , कार्यालयीन अधीक्षक प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, शिवाजी चोपडे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.