संत ज्ञानेश्वर विद्यालयात रथसप्तमी निमित्त सूर्यनमस्काराचे आयोजन
अहमदपूर (गोविंद काळे) : दिनांक 16 फेब्रुवारी रोजी संत ज्ञानेश्वर विद्यालय येथे महिला पतंजली योग समितीतर्फे सूर्यनमस्कार या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापक आशा रोडगे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून पतंजलीच्या जिल्हा संवाद प्रभारी कलावती भातांब्रे, तालुकाध्यक्ष पुष्पा ठाकूर, आंतरराष्ट्रीय योग शिक्षिका वृषाली चवळे उपस्थित होत्या. सूर्यनमस्काराचे महत्त्व व त्याचे फायदे यावर योग शिक्षिका कलावती भातांब्रे यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले. आंतरराष्ट्रीय योगशिक्षिका वृक्षाली चवळे व पुष्पा ठाकूर यांनी सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
पुढे बोलताना कलावती भातांब्रे म्हणाल्या की सूर्य म्हणजे तेज, प्रकाश, ज्ञान, सातत्य,परोपकार, सामर्थ्य, सत्य याचे प्रतीक आहे. सूर्य हा सर्व प्राणिमात्राचा प्राण दाता आहे. त्याच्या प्रकाशामुळे शेतात अन्नधान्य पिकते. वृक्षवेली वाढतात. सूर्याच्या कोवळ्या उन्हातून सजीवांना डी जीवनसत्त्व मिळते. म्हणूनच सूर्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमीला सूर्याची उपासना करतात.तो योग साधून अहमदपूरच्या महिला पतंजली समितीने संत ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना दररोज पालकांसोबत 108 सूर्यनमस्कार करण्याचे आवाहन केले आहे.यावेळी भारत स्काऊट आणि गाईड मधील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमात मुख्याध्यापक मीनाक्षी तोवर सह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार मीनाक्षी तोवर यांनी मानले.शेवटी पसायदान घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.