अहमदपूरातील महामार्ग लोकार्पण व भूमिपूजन सोहळा केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : शेतकरी अन्नदाता तर आहेच मात्र तो आता ऊर्जादाता झाला पाहिजे, महामार्ग विकासामुळे ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटी वाढून शेतीमाल वाहतूक, शेती उद्योगास चालना मिळाली आहे यामुळे ग्रामीण भागात शेतीमालावर आधारित कारखाने उभा राहून ,शेतकऱ्यांनी यापुढे शेतीमाल उत्पादनाबरोबरच शेती आधारित ऊर्जा निर्मितीमध्ये ही सिंहाचा वाटा उचलला पाहिजे असे प्रतिपादन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी अहमदपूर येथील महामार्ग लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यात बोलताना व्यक्त केले. यावेळी एन एच- 361 औसा चाकूर, चाकूर लोहा व आष्टामोड, आष्टा ,मलकापूर(उदगीर) एन एच 63 या रस्त्यांचे लोकार्पण संपन्न झाले. कोपरा ते घारोळा 149 कोटी व खरोळा ते बामणी रस्त्याचे चौपदरीकरण 35 कोटी व मुरुड अकोला, हवाई अड्डा जंक्शन ते महिला पॉलिटेक्निक य एन एच- 63 95 कोटी या रस्ते कामाचे भूमिपूजन ही यावेळी करण्यात आले. याच कार्यक्रमात धाराशिव जिल्ह्यातील काही रस्ते कामाचे लोकार्पण व भूमिपूजन सुद्धा संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व वाशिम चे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या दुःखद निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
लोकार्पण सोहळ्यात पुढे बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लातूर जिल्ह्यात दहा हजार कोटीचे रस्त्याची कामे झाल्याचे सांगितले. 2014 पूर्वी फक्त 124 किलोमीटर महामार्ग या जिल्ह्यात होते मात्र आता ते 324 किलोमीटर नवीन राष्ट्रीय महामार्ग झाल्याचे सांगितले. नागपूर ते रत्नागिरी हा एन एच- 361 हा महामार्ग मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र व कोकणास जोडणारा 926 किलोमीटर लांबीचा महामार्ग असून याचा खर्च 30000 कोटी आहे व ग्रामीण महाराष्ट्रासाठी हा मार्ग लाईफ लाईन आहे असे ते यावेळी म्हणाले. नवीन महत्त्वकांक्षी प्रकल्प शक्तिपीठ महामार्ग माहूर, तुळजापूर व कोल्हापूर हाही लवकरच पूर्ण होईल असे ते यावेळी म्हणाले हा मार्ग पूर्ण करून आपण आपल्या आईची इच्छा पूर्ण करत असल्याचे यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले.
येत्या काळात बग्यास पासून डांबर बनवणे इथेनॉल सारखेच हवाई इंधन बनवणे या प्रकल्पावर आपण मोठ्या प्रमाणात काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आता साखर कारखान्यांनी इथेनॉल च नाही तर बायो एविएशन फ्युएल म्हणजेच हवाई इंधनही बनवले पाहिजे असे ते म्हणाले. राज्यात चारशे इथेनॉलचे पंप चालू करणार असल्याचे सांगताना इथेनॉल मुळे शेतकरी समृद्ध होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लातूर जिल्ह्यातील पाणीटंचाईवर बोलताना त्यांनी लातूर जिल्ह्यात जलसंवर्धनाची अत्यंत गरज असल्याचे सांगून जागोजागी पाणी अडवले व जिरवले पाहिजे त्यामुळे इथल्या लोकप्रतिनिधींनी या विषयावर आणखीन काम करण्याची गरज असल्याचे सांगितले.
लातूर बार्शी टेंभुर्णी जाणारा हा रस्ता चार पदरी करणार असल्याचे सांगताना हा रस्ता आपण लवकरच पूर्ण करू असे ते यावेळी म्हणाले. जिल्ह्यातील इतर नवीन मंजूर प्रकल्पाची घोषणा करताना त्यांनी उदगीर देगलूर मार्गाला मंजुरी देत असल्याचे सांगितले उदगीर बायपास रस्त्यालाही मंजुरी देत असल्याचे सांगितले .
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार सुधाकर शृंगारे, क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व जिल्ह्याच्या रस्त्याच्या अनुषंगाने मागण्या मांडल्या. या कार्यक्रमास खासदार प्रताप पाटील चिखलीक,र खासदार सुधाकर शृंगारे ,क्रीडामंत्री संजय बनसोडे ,आमदार बाबासाहेब पाटील ,आमदार अभिमन्यू पवार, आमदार रत्नाकर गुट्टे, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर ,माजी मंत्री बाळासाहेब जाधव ,भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख आचार्य गुरुराज स्वामी, भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील, जिल्हाधिकारी वर्षा घुगे माजी आमदार बब्रुवान खंदाडे राहुल केंद्रे, सुधाकर भालेराव, गोविंद केंद्रे ,मनोहर धोंडे यांच्यासह अनेक मान्यवर या भागातील सर्व राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते व प्रशासकीय अधिकारी , राष्ट्रीय महामार्ग विकास मंडळाचे अनेक सन्माननीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्या कार्यक्रमास अहमदपूर व लातूर जिल्ह्यातील नागरिकांनी उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद दिला .