समाज प्रबोधन आणि श्रमप्रतिष्ठेचे पुजारी म्हणजे गाडगेबाबा – डॉक्टर शरदकुमार तेलगाणे
उदगीर (एल.पी.उगीले) : समाजाला अंधश्रद्धेच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी, समाजाच्या बोलीभाषेत प्रबोधन करण्याचे कार्य संत गाडगेबाबांनी केले. एका अर्थाने प्रबोधनाचे कार्य करत असतानाच श्रम प्रतिष्ठा आणि स्वच्छतेचे महत्व तसेच भूतदया या संदर्भात जनजागरण करण्याचा प्रयत्न करणारा एक आवलीया असेच लोक त्यांना संबोधत होते. राष्ट्रसंत असले तरी लोक त्यांना गाडगे बाबाच म्हणायचे, यातून एकात्मता आणि गाडगेबाबा बद्दलचा आदर दिसून येत होता.
राष्ट्र संत गाडगेबाबा महाराज यांच्या कडे जसा मानवतेचा विचार होता, तसाच विज्ञानवादी दृष्टिकोनही होता. त्यामुळे सामाजिक जाणीवा जपणाऱ्यांनी राष्ट्रसंत गाडगेबाबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, असे आवाहन समाज प्रबोधनात्मक कीर्तन करणारे, उदगीर शहरातील प्रख्यात स्त्री रोग तज्ञ डॉ. शरदकुमार तेलगाने यांनी केले.ते राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या 148 व्या जयंतीच्या निमित्ताने गाडगेबाबा चौकात आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. यावेळी उपस्थित परिसरातील मान्यवरांनी गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या प्रती आपल्या सद्भावना व्यक्त केल्या.
पुढे बोलताना डॉक्टर म्हणाले की, राष्ट्रसंत गाडगेबाबा यांना संपूर्ण समाजाची काळजी होती, समाज जागृत झाला पाहिजे. विज्ञानवादी झाला पाहिजे. अंधश्रद्धेतून बाहेर आला पाहिजे. दगडातील देवापेक्षा माणसातील देव शोधला पाहिजे, असा अट्टाहास ठेवून ते आपल्या प्रत्येक कीर्तनातून कोणी देव पाहिला का ? असा प्रश्न करून माणसातील देवाला शोधा, असा संदेश ते देत होते. अत्यंत तळमळ आणि निष्ठेने सामान्य माणसाचे हित जपले जावे, केवळ रूढी परंपरा आणि अंधश्रद्धेच्या कारणाने त्याचे नुकसान होऊ नये. अशी भावना सतत त्यांच्या वक्तव्यातून आणि कृतीतून दिसून येत होती. स्वच्छतेचा दूत म्हणून लोक त्यांच्याकडे पाहत होते. समाजाला प्रगत करायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यासाठी समाजाला शिक्षणाचे महत्त्व कळाले पाहिजे, म्हणून ते वेगवेगळे दाखले आणि दृष्टांत देऊन भोळ्याभाबड्या जनतेला शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करत होते. समाजाच्या प्रगतीचे स्वप्न पाहणारे एक ध्येयवेढे संत म्हणून लोक त्यांच्याकडे पाहत होते.
वास्तविक पाहता ज्ञान विज्ञान आणि सामाजिक जाण, भान असलेले एक कृतीशील व्यक्तिमत्व म्हणजे राष्ट्रसंत गाडगे महाराज होते. असेही डॉ. शरदकुमार तेलगाणे यांनी यावेळी सांगितले.