भाजपाची दडपशाही मोडीत काढा, निर्भय बना – निखिल वागळे
उदगीर (एल.पी.उगीले) : सध्या भारतीय जनता पक्षाने दबाव तंत्राचा वापर करून मोठमोठ्या नेत्यांना भाजपमध्ये यायला भाग पाडले आहे. ही गुंडशाही आणि शासकीय यंत्रणांचा गैरवापर करणाऱ्या सरकारला वेळीच धडा शिकवा. त्या राज्यामध्ये अघोषित आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनतेने सावध होणे गरजेचे आहे. हुकूमशाही आणि भांडवलशाही प्रवृत्ती जोर धरू लागली आहे, सर्वसामान्य माणसाचे मूलभूत अधिकार देखील संकटात आले आहेत.विरोधक संपवण्याचे षडयंत्र रचले जात आहे. सर्वसामान्य नागरिकांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करून भारतीय जनता पक्ष आणि वेगवेगळ्या पक्षाशी गद्दारी करून भारतीय जनता पक्षात गेलेल्या गद्दारांना धडा शिकवा. पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी कृत्य भारतीय जनता पक्षाने केले पक्षाचे संस्थापक पक्षाचे कोणीच नाहीत असे सांगून पक्ष दुसऱ्याच्या हवाली केला ही प्रवृत्ती लोकशाहीला घातक आज पर्यंत महाराष्ट्रात असे कधीही झाले हुकूमशाहीकडे होत असलेली वाटचाल वेळीच थांबली पाहिजे.असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी उदगीर येथील नगर परिषदेच्या मैदानात आयोजित निर्भय बनो सभेत मार्गदर्शन करताना केले.
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रसेवा दलाचे नितीन वैद्य, सोमनाथ रोडे, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे, डॉ. ज्योती सोमवंशी, डॉ. अंजुम कादरी इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी पुरोगामी विचारांची मशाल पेटवण्यात आली तदनंतर गजानन सताळकर यांनी राज्यघटनेच्या प्रस्ताविकेचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनता दलाचे नेते अजित शिंदे यांनी केले. याप्रसंगी सोमनाथ रोडे, नितीन वैद्य यांचेही समायोजित भाषणे झाली.
पुढे बोलताना निखिल वागळे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष म्हणजे पक्ष फोडणारा आणि शासकीय यंत्रणांचा गैरवापर करणारा पक्ष बनला आहे. पक्ष फोडत फोडत आता घरे फोडायलाही यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे आपण वेळीच सावध होणे गरजेचे आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करा. प्रसिद्धी माध्यमांनी सरकार कोणाचेही असो विरोधी पक्षाची भूमिका बजावायला पाहिजे, मात्र माध्यमांच्या मालकांनाच आपलेसे करून माध्यमांना देखील बटीक बनवण्याचे काम भाजप करत आहे. नागरिकांनी सावध होणे गरजेचे आहे. परिवर्तनाची नांदी घडायला 2024 ची निवडणूक एक माध्यम ठरू शकेल. त्या दृष्टीने सर्वसामान्य माणसाने आपापल्या परीने पुरोगामी विचारधारा पटवून द्यायला सुरुवात केली पाहिजे. समाजामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचे पाप राज्य सरकार, केंद्र सरकार करत आहे.
मराठा आरक्षणाचा घोळ घालून समाजामध्ये असंतोष माजला पाहिजे, असेच कृत्य सरकार करत असल्याने लोकांमध्ये नाराजी आहे. ती नाराजी मतपेटीतून व्यक्त होऊ द्या. असेही वागळे यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाची वाटचाल ही हुकूमशाही प्रवृत्तीकडे असल्याने जनतेने वेळीच सावध झाले पाहिजे. निव्वळ फसव्या जाहिराती आणि घोषणेबाजीने लोकांना भुरळ घालण्याचे काम मोदी सरकार करत आहे. अच्छे दिन ची घोषणा हवेत विरली आहे, देशांमध्ये प्रचंड बेकारी वाढली आहे. सर्व सरकारी विभाग खाजगीकरण करून टाकल्यामुळे नोकऱ्या शिल्लक राहिल्या नाहीत. शेतकरी, कष्टकरी ही अडचणीत सापडले आहेत. महागाईने तर कळस गाठला आहे. या सर्व परिस्थितीला बदलण्यासाठी सरकार बदलणे गरजेचे आहे. असेही नितीन वागळे यांनी याप्रसंगी सांगितले.