अहमदपूर शहरात रामदेव दरबार- श्री गणेश -श्री महादेव यांची प्राणप्रतिष्ठा सोहळा
मोकळ्या जागेत ३१ फुट उंचीचे कोपेश्वर महादेवाची स्थापना
अहमदपूर (गोविंद काळे) : या शहरातील तळेगाव रोडच्या बाजूला असलेल्या रामदेव बाबा नगर येथे नवनिर्मित श्री गणेश , रामदेव बाबा दरबार– द्वारकाधीश अवतार ,कुलदेवी सरल्यादेवी राजस्थान व मंदिराच्या बाजूच्या मोकळ्या जागेत भव्य दिव्य असलेले एकतीस फूट उंचीचे गोपेश्वर महादेव यांची मुर्ती ,नंदी व पिंड याची प्राणप्रतिष्ठा दिनांक २९ फेब्रुवारी रोज गुरुवारी दुपारी १२:३१ वाजता अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
या प्राणप्रतिष्ठापनेसाठी दिनांक २५ ते २९ फेब्रुवारी पर्यंत भरगच्च धार्मिक कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत. दिनांक २७ रोज मंगळवारी सकाळी नऊ ते बारा या वेळेत अग्नीत्सव याबरोबरच सायंकाळी सहा वाजता डॉक्टर अमीर लड्डा परभणी यांचे संगीतमय- सुंदर कांड ,असा भव्य कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. दिनांक २८ रोज बुधवारी सकाळी नऊ वाजता या शहरातील बालाजी मंदिर मारवाडी गल्ली येथून भव्य दिव्य स्वरूपाची शोभायात्रा ही शहराच्या मुख्य रस्त्यांवरून वाजत -गाजत मोठ्या दिमाखाने रामदेव बाबा नगर तळेगाव रोड येथे पोहोचणार आहे. याच दिवशी संध्याकाळी नऊ वाजता प्रसिद्ध गायक सुशील बजाज हैदराबाद हे रामदेव बाबा –द्वारकाधीश अवतार यांचे जन्मापासून ते समाधी पर्यंतचे संपूर्ण चरित्र संगीतमय पद्धतीने भक्तांसमोर सादर करणार आहेत.
दिनांक २९ फेब्रुवारी रोज गुरुवारी सकाळी नवनिर्मित प्राणप्रतिष्ठेचे पूजन खालील मान्यवरांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात करण्यात येणार आहे. यावेळी खासदार सुधाकर शृंगारे ,माजी मंत्री बाळासाहेब जाधव ,आमदार बाबासाहेब पाटील, माजी मंत्री विनायकराव पाटील ,माजी आमदार बब्रुवान खंदाडे, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख ,भाजपा प्रवक्ते गणेश हाके पाटील , माजी सभापती अयोध्याताई केंद्रे , उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी ,उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर , पोलीस निरीक्षक व्हि. डी.भुसनुरे आदींसह मान्यवर यावेळेस उपस्थित राहणार आहेत.
या शहरातील तळेगाव रोडच्या बाजूला रामदेव बाबा नगर येथे गोपीकिशन भराडीया यांनी सर्व भाविक भक्तांसाठी मंदिराचे बांधकाम करून देवतांची स्थापना केली आहे. येथे श्री गणेश जी, श्री रामदेव बाबा दरबार तथा द्वारकाधीश अवतार व कुलदेवी सूरल्याजी माता देवी राजस्थान यांची व बाजूला मोकळ्या जागेत तब्बल ३१ फूट उंचीचे गोपेश्वर महादेवांची भव्य दिव्य आकर्षक मूर्ती ,नंदी व पिंड याची स्थापना करण्यात आलेली आहे. या सर्व कार्यक्रमासाठी शहरासह परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन ॲड.संतोष भराडिया व डॉक्टर सचिन भराडिया यांनी केली आहे.