उदगीरचे भूमिपुत्र डॉ. अजित वाडीकर यांच्या चित्रपटास प्रथम क्रमांकाचे दोन पुरस्कार
उदगीर (एल.पी.उगीले) : नुकत्याच संपन्न झालेल्या ५७ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अनेक कलाकारांचा गौरव करण्यात आला. हा सोहळा नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया, डोम थिएटर वरळी येथे आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आदी मान्यवरांनी या सोहळ्यास उपस्थिती लावली होती.
स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार – 2021 हा पुरस्कार सोनू निगम, 2022 विधू विनोद चोप्रा यांना प्रदान करण्यात आला. स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार – 2022 हा पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री हेलन यांना प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र भूषण पुरस्कार – अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आला. दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक – 1 अजित वाडीकर यांना चित्रपट वाय साठी प्रदान करून गौरविण्यात आले. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक क्रमांक – 1 अजित वाडीकर यांच्या वाय चित्रपटास प्रदान करण्यात आला. डॉ. अजित वाडीकर हे वैद्यकीय शिक्षण एम. बी. बी. एस. पूर्ण करून ते स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना त्यांना चित्रपट विषयावर काही पुस्तके वाचण्यात आली. तिथेच त्यांना चित्रपटाविषयी आवड निर्माण झाली. वाचण्याच्या छंदाने त्यांनी स्वत:च स्वतःला प्रशिक्षित केले.आणि आपल्या सर्जनशीलतेने प्रथम क्रमांकाचे दोन पुरस्कार मिळविले. त्यांच्या या सर्जनशील कार्याबद्दल नवरंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतभाऊ चामले, डॉ. माधव चंबुले, डॉ. बाळासाहेब पाटील, बाळासाहेब नवाडे, प्रा.बिभीषण मद्देवाड,अजय डोणगावकर आदींनी अभिनंदन केले आहे.