स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांचा सत्कार
लातूर (प्रतिनिधी) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांचा महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांच्या हस्ते शाल, पुष्पहार, स्मृतिचिन्ह आणि पेढे देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, डॉ. एम. के. पाटील आणि लेखविभागाचे डॉ. अंधारे, प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे यांच्यासह नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातील विद्यापीठ सलग्नित महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि प्रशासकीय कर्मचारी यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा एकूण १६ शैक्षणिक यूनिट चालत असून महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाची सुरुवात सन १९७० रोजी झाल्याचे सांगून कला, वाणिज्य, विज्ञान, संगणक शास्त्र, एम. सी. व्ही. सी. व्होकेशनल कोर्स आणि पदवी समाजकार्य अभ्यासक्रम अश्या एकूण सहा शाखामध्ये शिक्षण देणारे मराठवाड्यातील हे एकमेव महाविद्यालय असून नॅकचा “अ” दर्जा मिळालेला आहे. या महाविद्यालयामध्ये समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, तत्वज्ञान, गणित आणि भूगोल अश्या सहा विषयाचे पदवीव्युत्तर शिक्षण दिले जात असून तत्त्वज्ञान, भूगोल आणि समाजशास्त्र या तीन विषयाचे संशोधन केंद्र सुद्धा आहेत. महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाने शैक्षणिक विकासासोबत क्रीडा, समाजकार्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय व नेत्र दीपक कामगिरी बजावली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी नवनियुक्त कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी सन्माननीय संस्थाचालक, प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, कार्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.