गटातटाचे वाढत चालले वाद!! कार्यक्रमाआधीच झाले बॅनर बाद !!!

गटातटाचे वाढत चालले वाद!! कार्यक्रमाआधीच झाले बॅनर बाद !!!

उदगीर (एल. पी. उगिले) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आपापली संघटना बांधणीसाठी मैदानात उतरत आहेत. त्याचाच भाग म्हणून नेत्यांचे दौरे, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, सभा-संमेलने याच्यात वाढ झाली आहे. पक्ष संघटना अंतर्गत कार्यकर्त्यांना वेगवेगळी पदे देऊन, वेगवेगळ्या सेलमध्ये सक्रिय करून पक्षाला बळ मिळाले पाहिजे यासाठी सर्वच नेते, पुढारी कामाला लागले आहेत.

 यामध्ये राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी देखील आक्रमक पणे पुढे येथे आहे. उदगीर विधानसभा मतदार संघात लोकनेते स्व. चंद्रशेखर भोसले यांनी पक्ष सोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार संघात फारसे वजन राहिले नव्हते,असे म्हटले तर वावगे होणार नाही.  जिल्हा परिषद, नगरपरिषद या ठिकाणी तर नगण्यच अवस्था होती! पंचायत समितीतही एकमेव सदस्य निवडून आला होता. मात्र विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीने बाजी मारली, आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय बनसोडे हे विजयी झाले. उदगीरच्या सुदैवाने बनसोडे यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली. संधीचे सोने कसे करावे? हे कोणीही संजय बनसोडे यांच्या कडून शिकावे. अक्षरश: पायात भिंगरी बांधल्या गत हा नेता फिरतो आहे! कामाचा प्रचंड आवाका असल्यामुळे मतदार संघामध्ये विकास कामाची गती प्रचंड वाढली आहे. मात्र ही बाजू एका बाजूला मतदारसंघाच्या भल्यासाठी असली तरी, कार्यकर्त्यांसाठी मात्र भ्रमनिरास करणारी आहे की काय? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

 नेता जसा जसा मोठा होत जातो, त्याच्या दुप्पट प्रमाणात पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढत जातात! आणि या सर्वच अपेक्षांना पूर्ण करणे नेत्याच्या हातात राहत नाही. पक्ष संघटनेमध्ये असताना कार्यकर्त्यासाठी दिला जाणारा वेळ आता नेत्याला शक्य नसतो. मात्र ही बाब दुर्दैवाने कार्यकर्त्यांना समजत नाही. सर्व सामान्य कार्यकर्ता उदास व्हायला लागतो, तो निराश व्हायला लागतो. निवडणुकीच्या काळात आम्हाला विचारले जाते, मात्र त्यानंतर सत्ता आली की आम्हाला कोणी विचारत नाही. अशी एक खंत कार्यकर्त्यांच्या मनात बोचत असते.

 याच परिस्थितीमध्ये पक्ष संघटनेतील काही युवक, आघाडीतील पदाधिकारी आपल्या नेत्याला साथ देण्यासाठी पुढे येतात आणि त्यांची गती ही वाढलेली असते. त्यामुळे नेत्या सोबत योगायोगानेच त्यांचा संपर्क वाढत जातो. या मूठभर लोकांनाच आपला नेता जास्त भाव देतोय आणि आम्हाला कोलतोय! या भाषेत कार्यकर्ते भावना व्यक्त करू लागले आहेत.

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकमेव सदस्य असताना देखील पंचायत समिती ताब्यात घेतली आहे. प्रा. शिवाजीराव मुळे यांच्या रूपाने पंचायत समितीला सभापती म्हणून लाभला आहे. एका बाजूला मंत्री पद तर दुसऱ्या बाजूला पंचायत समितीचे बळ! या गोष्टीमुळे राष्ट्रवादीची ताकद हळूहळू वाढू लागली आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे जे वैभव होते ते गतवैभव पुन्हा प्राप्त करून घ्यावे, किंबहुना त्याच्यापेक्षाही पुढे जावे! या तयारीनिशी नेते आणि पुढच्या फळीचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

 त्यांना उत्साह मिळावा या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील आणि त्यांच्यासोबत इतरही अनेक मंत्री उदगीर दौऱ्यासाठी येत आहेत. सहाजिकच पक्ष संघटनेतील काही कार्यकर्त्यांनी, पुढाऱ्यांनी, पदाधिकाऱ्यांनी स्वागताच्या बॅनरची रेलचेल केली आहे. मात्र आपल्याला डावलून बॅनर बनवले गेले! बॅनर वर आपला फोटो नाही, नाव नाही. या कारणाने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी चांगलीच वाढत गेली आहे. यातूनच मग गटातटाचे आणि  हेव्या दाव्याचे राजकारण सुरू झाले आहे. या राजकीय मतभेदाचे दर्शन सर्वच राजकिय पक्षात असते, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस मधील हे मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. चक्क स्वागतासाठी उभारलेल्या बॅनर वरून आपल्याला नको असलेल्या कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे फोटो कापून बॅनर बाद करण्याचा पराक्रम काही जण करत असल्याचे चित्र उदगीर शहरात सर्रास दिसू लागले आहे!

 राष्ट्रवादी काँग्रेसला खऱ्या अर्थाने बळ देणाऱ्या काँग्रेस पक्षाला ही सध्या विचारात घेतले जात नाही, अशी एक दबकी चर्चा आता सुरू झाली आहे. सात आठ महिन्याच्या अंतराने नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीला सुरुवात होणार आहे. अजून तरी निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले नाही मात्र पूर्व तयारी म्हणून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. मात्र हेवेदावे वाढल्यामुळे महाआघाडीची बीघाडी तर होणार नाही ना? अशीही चर्चा हळूहळू सुरू झाली आहे. काँग्रेसच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचू लागल्यामुळे काँग्रेसजनही राष्ट्रवादीचे  वाढते प्राबल्य पाहून अस्वस्थ होत आहेत. एकंदर काय होईल? हे सांगता येत नसले तरी आजच्या घडीला बॅनर विद्रुप करणे, सरळ सरळ नेत्या बद्दल नाराजी व्यक्त करणे! हे प्रकार पाहिल्यास या गटातटाच्या राजकारणामुळे पक्ष संघटनचे नुकसान तर होणार नाही ना? याचाही विचार करणे आता गरजेचे झाले आहे. सर्वच कार्यकर्त्यांना आर्थिक सबळ करणे महाकठीण असते, मात्र मूठभर कार्यकर्ते मोठे होऊ लागले की इतर कार्यकर्त्यांच्या पोटात दुखायला सुरुवात होते! हा निसर्ग नियम आहे. आपल्याला डावलले जाते असे वाटल्यास आपल्यातील उपद्रव शकते दाखवून देण्यासाठी कार्यकर्ते पुढे येतात, आणि नेमकी हीच गोष्ट आत्मघातकी ठरत असते. कार्यकर्त्यासाठी ही आणि संघटनेसाठी ही!

 या गोष्टीची कार्यकर्त्यांना समज देणे देखील आता गरजेचे झाले आहे. आजच्या परिस्थितीत जर सर्वसामान्य कार्यकर्त्याला दुर्लक्षित ठेवले तर ते पक्ष संघटनेला महागात पडणारे आहे. सद्यस्थितीत आपण महा आघाडीत आहोत, सर्वच पक्षाचे ऐकून घ्यावे लागते. असे म्हणून जर इतर पक्षातील कार्यकर्त्यांना मोठेपण दिले जाऊ लागले तर, निवडणुकीच्या काळात ज्यांनी हाडाचे पाणी करून कष्ट उपसले आहे! त्या कार्यकर्त्याला वेदना होणे हे स्वाभाविक आहे. मानवी स्वभाव विचारात घेऊन त्या कार्यकर्त्यांच्या भावनेची कदर केली जावी. जेणेकरून तो काम करेल अगर ना करेल मात्र किमान तो विरोधात तरी जाणार नाही. याची काळजी नेत्यांनी घेणे गरजेचे आहे. कारण सर्व सामान्य कार्यकर्ता हाच कोणत्याही संघटनेचा केंद्रबिंदू असतो! तोच पाठीचा कणा असतो. तो जर बाजूला सरकला तर अस्तित्व संपायला वेळ लागत नाही. शून्यातून उभारलेली शक्ती पुन्हा शुन्याकडे जाणार नाही ना? याचीही दक्षता घेणे गरजेचे झाले आहे. नेते सुज्ञ आहेत! त्यांना स्वहित कळत असेलच! त्यांचे आणि त्यांच्या संघटनेचे भले व्हावे एवढेच!!!

About The Author