मराठा आंदोलनाला गद्दार कदापी रोखू शकणार नाहीत – दिलीप होनाळे
उदगीर (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असतानाच, प्रशासनाच्या वतीने काही गद्दारांना हाताशी धरून आंदोलनाला बदनाम करण्याचा कट रचला. मराठा आंदोलनाचे दुर्दैव हे की, मराठा समाजातीलच काही गद्दारांनी सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचे मांजर बनून मराठा आंदोलनाचा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना बदनाम करण्याचा घाट घातला. मात्र अशा गद्दारांच्या वक्तव्याचा आंदोलनावर कसलाही परिणाम होणार नाही. असे विचार दिलीप होनाळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून गेल्या सात दिवसापासून करडखेल पाटी येथे साखळी उपोषण सुरू आहे. उदगीर तालुक्यातील युवक मोठ्या तळमळीने गरजवंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. आंदोलन यशस्वीपणे होत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने मंत्री आणि नेत्यांना विरोध करण्याची भूमिका मराठा समाजाने घेतली. मात्र दुर्दैवाने पुन्हा काही झारीतले शुक्राचार्य आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी समाजहित बाजूला ठेवून मंत्र्यांच्या बगलेत बसले आहेत. कित्येक युवक रस्त्यावर उतरून काळे झेंडे दाखवत असताना काही गद्दार मराठे मात्र मंत्र्याच्या मागे पुढे फिरून आपल्याला काही मलिदा मिळतो का? यासाठी धडपड करत असल्याचे दुर्दैवी चित्र दिसले.
मराठ्यांचा स्वाभिमानाचा इतिहास पाहिल्यास प्रत्येक आंदोलनामध्ये, युद्धामध्ये गद्दारांनी धोका देऊन मराठ्यांचा घात केला आहे. मात्र यावेळेस सकल मराठा समाज एक झाला आहे. त्यामुळे आंदोलनाला बदनाम करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.
सकल मराठा समाजाने जी भूमिका घेतली त्या भूमिकेशी बांधील राहून सर्वांनी प्रामाणिकपणे समाजहित लक्षात घ्यावे. गरजवंत मराठ्यांना भावी आयुष्यामध्ये आरक्षण मिळवून, विकासाच्या प्रवाहात येणे गरजेचे आहे. याचे गांभीर्य सर्वांनी ओळखावे. असेही आवाहन दिलीप होनाळे यांनी केले आहे.
सध्या मनोज जरांगे पाटील यांना अडचणीत आणण्यासाठी शासनाच्या वतीने वेगवेगळे डाव रचले जात असले तरी, यावेळेस एकत्र झालेला मराठा समाज कदापि आपल्या उद्दिष्टापासून परावृत्त होणार नाही. काही विकाऊ प्रवृत्तीचे लोक बोलत सुटले असले तरी समाज त्यांना भिक घालणार नाही. मंत्र्या, संत्र्याच्या पाठीमागे फिरणाऱ्या लाचार आणि स्वार्थी मराठ्यांना देखील समाज कधी माफ करणार नाही. तुमच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी सकल मराठा समाजाला वेठीस धरण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर भावी पिढी तुम्हाला कधीच माफ करणार नाही.
अद्याप मराठा आंदोलकांनी अशा गद्दारांच्या संदर्भात आक्रमक भूमिका घेतलेली नाही, मात्र भविष्यात जर त्यांची बडबड नाही थांबली, जर स्वार्थी प्रवृत्ती लाचार होऊन आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल तर मराठा समाज कधी माफ करणार नाही. असेही परखड विचार दिलीप होणाळे यांनी व्यक्त केले आहेत.
मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून करडखेल पाटी येथे चालू असलेल्या साखळी उपोषणाला सर्व समाजाचा पाठिंबा आहे. युवकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग नोंदवावा. योद्धा ला जेव्हा पराभूत करणे शक्य होत नाही तेव्हा कुटील राजनीतिज्ञ त्याला बदनाम करण्याचा घाट घालत असतात, या गोष्टीचे भान तरुणांनी ठेवणे गरजेचे आहे. तसेच ही गोष्ट सकल मराठा समाजाने लक्षात ठेवून आपल्या आंदोलनाचा रेटा कायम ठेवला पाहिजे. प्रसंग काहीही असो आपण सज्ज होऊन मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत कायम राहू या.असेही आवाहन दिलीप होनाळे यांनी केले आहे.