स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा कोल्हापूर, पुण्याच्या मल्लांचा बोलबाला!
उदगीर (एल.पी.उगीले): क्रीडा व युवक कल्याण सेवा संचालनालय आयोजित स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरचा रणजित पाटील, पुणे जिल्ह्याचा निखिल कदम व पुणे शहरचा साकेत यादव या मल्लांनी फ्री स्टाईल प्रकारात आपापल्या वजनी गटात बाजी मारून सुवर्णपदक पटकाविले. ग्रीको रोमन प्रकारात कोल्हापूरचा वैभव पाटील, कोल्हापूरचा नितीन कांबळे व पुणे जिल्ह्याचा दिग्विजय भोंडवे यांनी आपापल्या गटात वर्चस्व गाजवित सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. स्पर्धेत कोल्हापूर आणि पुण्याचा मल्लांचा बोलबाला बघायला मिळाला.उदगीर येथील तालुका क्रीडा संकुलामध्ये ही राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा सुरू आहे. उदगीरच्या धावत्या दौर्यात क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी दुरदृष्य प्रणालीव्दारे दुसर्या दिवशीच्या कुस्ती स्पर्धा नियोजनाचा आढाचा घेतला. फ्री स्टाईल प्रकारातील ५७ किलो वजनी गटात शेतकर्याचा मुलगा आणि गतविजेत्या कोल्हापूरच्या रणजित पाटील यंदाही निर्विवाद वर्चस्व गाजवित या स्पर्धेत दुसर्यांदा सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. त्याने अंतिम लढतीत लातूरच्या आकाश गदेला १०-० गुण फरकांनी लोळवले. आकाशला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या गटात अहमदनगरचा ओम वाघ व सांगलीचा निनाद बडरे कांस्यपदकाचे मानकरी ठरले. ७० किलो वजनी गटात पुणे जिल्ह्याच्या निखिल कदमने कोल्हापूरच्या निलेश हिरूगडेचा ३-० गुण फरकाने पाडाव करीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. निलेशला रौप्यपदक मिळाले, तर कोल्हापूरचा अनुप पाटील व सातार्याचा ओंकार फडतरे यांनी कांस्यपदक जिंकले. ९७ किलो वजनी गटात पुणे शहरचा साकेत यादव सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. अंतिम लढतीत साकेतकडून ११-० फरकाने दारूण पराभव झाल्याने कोल्हापूरच्या शशिकांत बांगरला रौप्यपदक मिळाले. सोलापूरचा लक्ष्मण पाटील व सातार्याचा अजय थोरात यांना कांस्यपदके मिळाली.
चौकट..
सांगलीच्या प्रतिक्षा बागडीला सलग दुसरे सुवर्ण
डबल महाराष्ट्र केसरी व एक वेळची राष्ट्रीय पदकविजेती सांगलीची प्रतिक्षा बागडी हिने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करीत स्व. खाशाबा जाधव चषक महिला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत ७६ किलो गटात सलग दुसर्या वर्षी सुवर्णपदक जिंकले. पोलीस हवालदाराची मुलगी असलेल्या प्रतिक्षाने सुवर्णपदकाच्या लढतीत कोल्हापूरच्या वेदिका सासणेचा ७-१ गुण फरकाने धुव्वा उडविला. वेदिकाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर पुणे जिल्ह्याची सिद्धी शिंदे व कोल्हापूरची अंकिता फातले कांस्यपदकाच्या मानकरी ठरल्या. ५९ किलो गटात पुणे शहरची कल्याणी गदेकर सुवर्णपदकाची मानकरी ठरली. पुणे जिल्ह्याच्या आकांक्षा नलावडेला रौप्यपदक, तर कोल्हापूरच्या सृष्टी भोसलेला कांस्यपदक मिळाले. ५० किलो गटात पुणे शहरची ज्ञानेश्वरी पायगुडे व कोल्हापूरची आर्या पाटील यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले. कोल्हापूरची प्रमिला पवार व अहमदनगरची आयशा शेख यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.