उदयोत्सवाचा दुसरा दिवस रंगला खाद्य आणि सांस्कृतिक मेजवानीने
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलन 2024 च्या निमित्ताने विविध खाद्यपदार्थांचे स्टॉलच्या माध्यमातून भव्य आनंदनगरीचे आयोजन करण्यात आले होते. याला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. या आनंदनगरीचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.के.मस्के, विद्यार्थी कल्याण मंडळ प्रमुख डॉ.एस.एन.लांडगे, आनंद नगरी समिती प्रमुख डॉ.एम.पी. मानकरी, डॉ.मल्लेश झुंगास्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रतीवर्षाप्रमाणे महाविद्यालयाच्या स्थापनेपासून महाविद्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या फोटो ग्रंथालयात जतन करून ठेवले आहेत, त्या फोटोचे प्रदर्शन ग्रंथालयातर्फे करण्यात आले. त्याचे उद्घाटन माजी प्रा.बी.बी.शेख तसेच 1980 बॅचच्या माजी विद्यार्थिनी कोचेवाड मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सदस्य महादेवअप्पा नौबदे आणि बसवराज पाटील मलकापूरकर हे उपस्थित होते.प्रदर्शन पाहण्यासाठी माजी विद्यार्थी आणि आजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. विज्ञान विभागातर्फे विज्ञान प्रदर्शन सादर करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिक तसेच पोस्टर्स प्रदर्शित केले. उर्दू विभागातर्फे उर्दू शायरीचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये उर्दू विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवून विविध सुप्रसिद्ध शायरी सादर केल्या. यासाठी उर्दू विभागातील विभाग प्रमुख प्रा.डॉ.हमीद अश्रफ आणि प्रा.डॉ.मकबूल अहमद यांनी विशेष प्रयत्न केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव रामभाऊ तिरुके यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अंतर्गत वैयक्तिकनृत्य, समूहनृत्य, गीत गायन, समूह गायन, स्किट आणि विडंबन इत्यादी कलाप्रकारात 52 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून, एकूण 33 कलाप्रकार सादर केले. यामध्ये विशेषतः मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात होती. विद्यार्थ्याना प्रशिक्षक म्हणून सुनील ममदापुरे, अमित सोनकांबळे यांनी कार्य केले. सांस्कृतिक समिती चे प्रमुख प्रा.डॉ.बी.एस.भुक्तरे आणि प्राचार्य डॉ.आर.के.मस्के यांनी यासाठी मार्गदर्शन केले.