राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे गरजूंना दोन वर्षापासुन प्रस्ताव धुळखात, लाभार्थी हेलपाटे मारुन बेजार अर्थसहाय्य मिळेना
देवणी (प्रतिनिधी) : दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील १८ ते ५९ वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयास एक रकमी २० हजार रुपयाचे अर्थसाहाय्य देण्यात येते. कुटूंब प्रमुखाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्वरित आर्थिक मदत देण्याकरिता सुरू करण्यात आलेली ही एक महत्वपूर्ण योजना आहे. मात्र देवणी तालुक्यातील अशा पात्र कुटुंबांना अद्यापही मदत मिळालेले नाही. त्या कुटुंबांना तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, या मागणीचे निवेदन श्रमिक क्रांती अभियान महाराष्ट्र राज्य वतीने देवणी तहसीलदारांना देण्यात आले. या योजनेअंतर्गत पात्र लाभधारकांनी या योजनेचा लाभ मिळण्यासाठी तहसिल कार्यालयात रीतसर अर्ज करून अनेक महिने लोटली आहेत. तरीही संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे सदर योजनेपासून पात्र लाभार्थी वंचित राहत असून अशा कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.या योजनेअंतर्गत पात्र
लाभधारकांनी तहसिल कार्यालयात परिपूर्ण प्रस्ताव सादर केलेले आहेत. सदर प्रस्तावास तात्काळ मंजूरी देण्यात यावी,अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष गजानन गायकवाड, लक्ष्मण रणदिवे, देविदास सुर्यवशी,आदीच्या स्वाक्षरी आहेत.