स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा,भाग्यश्री फंडने गाजविला उदगीरचा फड
संजना बागडी, आश्लेषा बागडे, गौरी पाटील यांचीही सोनेरी कामगिरी
उदगीर (एल.पी.उगीले): आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू व महाराष्ट्र केसरी किताबाची मानकरी असलेल्या भाग्यश्री फंड हिने अपेक्षेप्रमाणे आपल्या गटात निर्विवाद वर्चस्व गाजवित स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा फड गाजविला. याचबरोबर संजना बागडी, आश्लेषा बागडे, गौरी पाटील यांनीही आपापल्या वजनी गटात बाजी मारत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
राज्य शासनाच्या क्रीडा व युवक संचलनालयाच्या वतीने उदगीर येथील तालुका क्रीडा संकुलामध्ये ही राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा सुरू आहे. श्रीगोंद्याच्या (जि. नगर) भाग्यश्री फंड हिने ६२ किलो गटातील अंतिम लढतीत सांगलीच्या पुजा लोंढेला पहिल्या फेरीतच लोळविले. लढतीला सुरूवात होताच भाग्यश्रीने एकेरी पटात घुसून पुजाच्या पाठीवर स्वार होत २ गुणांची कमाई केली. त्यानंतर भाग्यश्रीच्या मगरमीठीतून पुजाला स्वत:ची सुटका करून घेता आली नाही. मग भारंदाज डावावर सलग ८ गुणांची कमाई करीत भाग्यश्रीने पहिल्या फेरीतच पूजाचा खेळ खल्लास करीत सुवर्णपदक जिंकले. भाग्यश्रीने फायनलपर्यंतच्या प्रवासातही एक मिनिटांतच सर्व कुस्त्या मारून उदगीरचा राज्यस्तरीय आखाडा गाजविला, हे विशेष. पुजा लोंढे रौप्यपदकाची मानकरी ठरली, तर सातार्याच्या सिद्धी कणसेने कांस्यपदकाची कमाई केली.
महिलांच्या ७२ किलो गटातील सुवर्णपदकाच्या लढतीत सांगलीच्या संजना बागडी हिने लातूरच्या आराधना नाईकचा १०-० फरकाने फडशा पाडला. आराधनाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर सातार्याची प्रिती पाटील व नगरची सोनिया सरक यांना कांस्यपदके मिळालीत. ५७ किलो गटात सातार्याची आश्लेषा बागडे व लातूरची अंकिता जाधव यांच्यात तोडीस तोड लढत झाली. लढत २-२ अशी बरोबरीत असताना आश्लेषाने चितपट कुस्ती मारून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. रौप्यपदकावर समाधान मानावे लागल्याने अंकिता निराश झाली. पिंपरी-चिंचवडची निर्मिती मुन्हे व कोल्हापूर शहरची श्रद्धा कुंभार यांनी कांस्यपदकांची कमाई केली. ५३ किलो गटातील अंतिम लढतीत कोल्हापूरच्या गौरी पाटीलने कोल्हापूरच्याच तृप्ती गुट्टा हिला १२-३ गुण फरकाने धुळ चारत सुवर्णपदकाची कमाई केली. सेजल धरपळे पल्लवी बागडी यांना कांस्यपदके मिळाली.
दोन दिवसात पार पडलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. यावेळी क्रीडा उपसंचालक संजय सबनीस,क्रीडा उपसंचालक उदय जोशी, युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे आदीसह पैहलवान आणि मान्यवर मंडळी उपस्थित होते
श्रीकांत, सुरज, पार्थ, ओंकार, राकेश, सतीशला सुवर्ण
- स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या पुरूष विभागात कोल्हापूरचा सुरज अस्वले व नाशिक जिल्ह्याचा पवन डोन्नर यांच्यातील ६१ किलो गटातील अंतिम लढत अतिशय लक्ष्यवेधी ठरली. अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखायला लावणार्या या कुस्तीत अखेर सुरजने १२-७ गुण फरकाने बाजी मारत सुवर्णपदकावर नाव कोरले, तर पवनला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या गटात कोल्हापूरचा विजय डोंगरे व पुणे शहरचा अमोल वालगुडे कांस्यपदकाचे मानकरी ठरले. ६० किलो गटात कोल्हापूरच्या श्रीकांत कामण्णने अंतिम लढतीत सोलापूरच्या आकाश सरगरचा ७-४ गुण फरकाने पराभव करीत सुवर्णपदकावर नाव कोरले. आकाशला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर नाशिक जिल्ह्याचा अतुल मेदडे व कोल्हापूरचा प्रतिक पाटील कांस्यपदकाचे मानकरी ठरले. ६७ किलो गटात पुणे शहरच्या पार्थ कंधारेने जळगावच्या अरबाज पठाणचा ८-० गुण फरकाने धुव्वा उडवून सुवर्णपदक पटकाविले. अरबाजला रौप्यपदक मिळाले, पुणे जिल्ह्याचा वैष्णव आडकर व कोल्हापूरचा माऊली टिपुगडे यांनी कांस्यपदके जिंकले. ७२ किलो गटात कोल्हापूरच्या ओंकार पाटीलने अंतिम लढतीत सोलापूरच्या किरण सत्रेचा ९-० फरकाने पराभव करीत सुवर्णपदक जिंकले. किरण रौप्यपदकाचा मानकरी ठरला, तर नाशिक जिल्ह्याचा पार्थ कमाळे व सांगलीचा जयदीप बडरे हे कांस्यपदकाचे मानकरी ठरले. ७४ किलो गटात कोल्हापूरच्या राकेश तांबुळकरने कोल्हापूरच्याच अभिजीत भोसलेचा २-१ असा पराभव करीत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. या गटात पुणे जिल्ह्याचा अनिल कचरे व कोल्हापूरचा सातपा हिरगुडे यांना कांस्यपदके मिळाली. ९७ किलो गटातील सुवर्णपदकाच्या लढतीत सांगलीच्या सतीश मुंढेने कोल्हापूरच्या रोहन रेडेचे आव्हान ९-५ फरकाने मोडून काढले. रोहनला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. सोलापूरचा निकेतन पाटील व लातूरचा योगीराज नागरगोजे यांना कांस्यपदके मिळाली.
कुस्तीस्पर्धेत हलगीचा निनाद
उदगीर येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर चालू असलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत पारंपरिक हलगी वाद्याचा निनाद संपूर्ण मैदानात निनादत होता. हलगी वाद्याला ग्रामीण भागात मोठे महत्व आहे. मात्र डीजे च्या झगमगाटात हलगीचा लोप होतो की काय अशी स्थिती झाली असताना कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने उदगीरकरांना हलगीचा निनाद अनुभवता आला.