एकंबेकर महाविद्यालयात जागतिक महिला दिन सप्ताहा निमित्त विविध उपक्रम
उदगीर (एल.पी.उगीले) : कै.बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालयात जागतिक महिला दिन सप्ताह साजरा करण्यात आला, या सप्ताहात महिलांच्या जनजागृतीसाठी तथा त्यांच्या सूक्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव माजी प्राचार्य विजयकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयातील ग्रंथालया मार्फत स्त्री लेखिकांच्या ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते, गृह विज्ञान विभागामार्फत विद्यार्थिनींनी तयार केलेल्या टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन करण्यात आले. समाजशास्त्र विभागामार्फत विद्यार्थी कौशल्य विकास कार्यक्रमातून साकारण्यात आलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. दुपारच्या सत्रामध्ये प्राध्यापिका रेखा लोणीकर यांचे विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा व आहारशास्त्र या विषयावर सखोल मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी प्रा.डॉ. शिवहार साळुंखे यांचे महिला सबलीकरणावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. दुपारच्या सत्रात महिला सक्षमीकरणावर आधारित ‘कारगिल गर्ल’हा चित्रपट विद्यार्थ्यांना महाविद्यालयात दाखवण्यात आला. कार्यक्रमाच्या समारोपात संस्थेच्या कोषाध्यक्ष सौ मृदुलाताई पाटील यांनी स्त्री पुरुष समानता या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ओमप्रकाश क्षीरसागर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. हिरा मोरतळे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. डॉ.दाडगे सुरेखा यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा.रेखा लोणीकर यांनी मानले.