दबाव तंत्राचा वापर केल्याने सकल मराठा समाज घाबरणार नाही – विवेक जाधव
उदगीर (एल.पी.उगीले) : सकल मराठा समाजाच्या वतीने गरजवंत मराठा तरुणांच्या भवितव्याचा विचार करून आरक्षणाचा विषय सरकार दरबारी मांडला होता. गेल्या अनेक वर्षापासूनची ही मागणी असताना देखील सरकारच्या वतीने वेळोवेळी आंदोलकांना आश्वासने देऊन, दिशाभूल करण्याचे पाप सरकार करत आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा योद्धा मनोज जरांगे पाटील कशालाही घाबरत नाहीत, हे पाहिल्यानंतर त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र ही सरकारने सुरू केले, मराठा समाजात उभी फूट पाडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. बदनामी चा घाट घातला आणि यालाही सकल मराठा समाज भिक घालत नाही, हे लक्षात येताच मराठा तरुणावर गुन्हे दाखल करणे, त्यांचे भवितव्य अंधारमय करून भविष्याबद्दल भीती निर्माण करणे, अशा प्रकारचे कुटील डाव रचले जात असले तरी मराठा समाज त्याला भीक घालणार नाही. असे विचार सकल मराठा समाजाच्या वतीने युवा नेते विवेक पंडित जाधव यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांच्या सगे सोयरे अध्यादेशाची मागणी पूर्ण व्हावी, या मागणीसाठी उदगीर तालुक्यातील करडखेल पाटी येथे गेल्या पंधरा दिवसापासून साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणाचे नेतृत्व प्राधान्याने विवेक पंडित जाधव, बाळराजे पवार, प्रवीण जाधव, दिलीप होनाळे, नामदेव मुळे, श्रीराम बिरादार, उद्धव कंजे, प्रदीप गायकवाड, नामदेव गायकवाड, रामदास जाधव, योगेश मुळे, संतोष मोरे, वैभव ढगे, राजकुमार पवार, ज्ञानेश्वर पाटील इत्यादी करत आहेत.
शासनाच्या दबावाला बळी न पडता ठिकठिकाणी अशाच पद्धतीचे आंदोलन चालू आहे. हे आंदोलन चिरडण्यासाठी अंबाजोगाई येथे गुन्हे दाखल करण्याचा प्रकार घडला, तो अत्यंत चुकीचा आहे. सकल मराठा समाजाला सगेसोयऱ्यासह आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह 13 जनावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अंबाजोगाई येथे साधना मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीला थोडासा उशीर झाला म्हणून आयोजकासह मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये प्राधान्याने आयोजक सचिन सुभाषराव जोगदंड, राजेसाहेब देशमुख, विधीज्ञ माधव जाधव, अमर देशमुख, अजित गरड लोमटे रणजीत, अमोल लोमटे, किशोर देशमुख, राहुल मोरे, विधिज्ञ जयसिंग सोळंके, विधीज्ञ किशोर देशमुख, भीमसेन लोमटे यांच्यासह साधना मंगल कार्यालयाचे मालक रविकिरण शामसुंदर मोरे यांच्या विरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन मध्ये भारतीय दंड विधान संहिता 505(1) (ब), 188 सहकलम महाराष्ट्र पोलीस कायदा 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकंदरीत शासनाच्या वतीने आता दबाव तंत्राचा वापर केला जातो आहे. तसेच चालू असलेल्या आंदोलनाला दुर्लक्षित करून यांचा काहीच परिणाम होणार नाही, असे भासवण्याचाही प्रयत्न केला जातो आहे. मात्र ही बाब सरकारला महागात पडेल. असा इशाराही विवेक जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिला आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने एकसंघ राहून आरक्षणाचा लढा शेवटपर्यंत लढणारच, असा विश्वासही त्यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला आहे.